पवई तलावात बोट उलटली; तिघांचा मृत्यू

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

पवई - तलावात बोट बुडून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला तर अन्य पाच जणांना वाचवण्यास यश आले आहे. शुक्रवारी रात्री हाऊस बोटीवर पार्टीसाठी जाणारी बोट अचानक बुडाली. बुडालेल्या तिघांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण रात्रभर शोधमोहीम राबवून देखील बुडालेल्या तिघांचा पत्ता नव्हता. शेवटी शनिवारी सायंकाळी या तिघांचे मृतदेह सापडले.

पवई तलावातील हाऊस बोटीवर नाईट पार्टी करण्याचा परेश भिकूबाई पांचोली (34), कुणाल भालचंद्र पाटील (35), रसुल मोहम्मद खान (43) आतीफ लतीफ खान (22) दिनेश भोईर (23) दिपक पाटील (24) आणि नरेेश पाटील (46) या मित्रांचा बेत होता, मात्र दिपक पाटील (24) आणि नरेेश पाटील (46) या दोघांनाही पोचण्यास उशीर झाला. हाऊस बोट मालकाने दोघांनाही पवईच्या गणेश घाटावर थांबण्यास सांगून मच्छीमार बोट चालक अबू बिहारी मंडल (21) याला दोन्ही तरूणांना आणण्यासाठी पाठविले मात्र आपल्या मित्रांना आणण्यासाठी उर्वरित पाच तरुणही परत गेले.

गणेश घाटावरून हे सर्वजण हाऊस बोटच्या दिशेने निघाले. मात्र घाटापासून 50 ते 60 मिटर अंतरावरच ही मच्छीमारी नौका तलावात कलंडली जाऊन बुडाली. पोहता येत असल्याने बोट चालक मंडल याच्यासोबत परेश आणि कुणाल यांनी स्वत:चा जीव वाचवला आणि किनारा गाठताच पोलिसांना तात्काळ माहिती दिली.

रात्री सव्वा अकराच्या सुमारास पवई पोलिसांसह अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि नौदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. नरेश आणि दिपक यांना वाचवण्यात जवानांना यश आले पण रसूल, आतिफ आणि दिनेश यांचा थांगपत्ता लागत नव्हता. बचाव पथकांनी या तिघांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण रात्रीच्या अंधारात शेवटपर्यंत या तिघांचा शोध लागत नव्हता अखेर शनिवारी संध्याकाळी या तिघांचे मृतदेह सापडले.

पुढील बातमी
इतर बातम्या