जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत रेल्वेच्या हद्दीत ३५ हजार गुन्ह्यांची नोंद

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वारंवार नियमांच पालन करा असं आवाहन केलं जातं. मात्र, तरीही प्रवासी नियम मोडत प्रवास करतात. अशा नियम मोडणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेनं कारवाई केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात प्रवास करताना प्रवाशांनी विविध नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत ३५ हजार ४१७ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये १०७ जणांना तुरुंगात टाकल्याचंही समजतं.

प्रवासात पादचारी पुलावरून न जाता अनेक जण शॉर्टकट म्हणून रूळ ओलांडतात. रूळ ओलांडताना अपघाताचाही धोका संभवतो. तरीही अनेक जण हा धोका पत्करतात. अशा प्रवाशांवरही रेल्वे कायद्यानुसार कारवाई केली जाते. दाखल झालेल्या ३५ हजार ४१७ गुन्ह्य़ांमध्ये रूळ ओलांडतानाचे गुन्हे अधिक आहेत.

स्टंट करणं, तिकीट तपासनीस किंवा तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणं, अस्वच्छता करणं अशा विविध गुन्ह्यांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १ कोटी ७४ लाख २० हजार ६२५ रुपये दंडही वसूल केला आहे. त्याशिवाय, रेल्वे हद्दीत मोठ्या प्रमाणात चोरी होते. यामध्येही २०६ गुन्हे दाखल झाले असून, १७१ गुन्ह्यांची उकल करण्यात रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. तसंच, तब्बल ४५० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

१ कोटी ९१ लाख ६५ हजार रुपयांची मालमत्ता चोरीला गेल्यानंतर यातील १ कोटी २५ लाख रुपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात रेल्वेला यश आले.

या वर्षांत अनधिकृत दलालांविरोधातही कारवाई करताना ३६९ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये ४०४ दलालांची धरपकड केली असून २१ जणांना तुरुंगाची हवा खावी लागली, तर १ लाख ३२ हजार रुपये दंडही वसूल केला. मागील ११ महिन्यांत घरातून पलायन केलेल्या १३८ अल्पवयीन मुले आणि ९१ मुलींना ताब्यात घेतानाच काहींना पालकांच्या ताब्यात दिले, तर काहींना सामाजिक संस्थांच्या हवाली केले.

पुढील बातमी
इतर बातम्या