डोंगरी बाल सुधारगृहातून ५ मुलांचं पलायन

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

मुंबईच्या डोंगरी परिसरातील बाल सुधारगृहातून ५ मुलांनी पलायन केल्याची घटना रविवारी संध्याकाळी उघडकीस आली. सुधारगृह परिसरात सुरू असलेल्या बांधकामाचा आडोसा घेत या मुलांनी पळ काढला असल्याचे बोलले जात आहे.

मुलांचा शोध सुरू

डोंगरी आणि मानखुर्द परिसरात दोन बालसुधारगृहे आहेत. बेपत्ता किंवा छोट्या-मोठ्या गुन्ह्यात दोषी असलेली मुलं ही या बाल सुधारगृहात पाठवली जातात. याचप्रमाणे डोंगरीच्या बाल सुधारगृहात असलेल्या मुलांनी रविवारी पलायन केलं. मुलांची हजेरी घेत असताना ही बाब समोर आली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून या मुलांनी पलायन केल्याचं बोललं जात आहे. पलायन केलेल्या मुलांची नोंद डोंगरी पोलिसांनी घेतली असून त्यांचा शोध सुरू असून बाल सुधारगृह या घटनेचा अहवाल सादर करणार आहे. तसेच या हलगर्जीपणाची चौकशी होणार असून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं बाल सुधारगृहातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

बालगुन्हेगारीत मुंबईसह महाराष्ट्र आघाडीवर

२००९ च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात ६,४६५ बालगुन्हेगारीचे गुन्हे नोंदवले गेले. त्यापाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये ५१७४, तर छत्तीसगडमध्ये २८६० गुन्हे नोंदवण्यात आले. विशेष म्हणजे महाराष्ट्रासह बाहेरून आलेली मुलं बालगुन्हेगारीच्या दलदलीत अडकलेली आहेत. महाराष्ट्रात मुंबई बालगुन्हेगारीत आघाडीवर आहे. मुंबईत दरवर्षी ८०० बालगुन्हेगारीची प्रकरणं नोंदवली जातात. ठाण्यात ५०० तर पुण्यात ३५९ अशी आकडेवारी आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या