फक्त 15 मिनिटांत तो टाकायचा दरोडा!

मुंबई - मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने मुलुंड येथील 80 लाखांच्या घरफोडीचा गुन्हा सोडवला असून या प्रकरणी त्यांनी राजेश शेट्टी नावाच्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.

विशेष म्हणजे या गुन्ह्यातील 80 लाख 62 हजारांच्या दागिन्याच्या चोरीतील 80 लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 28 डिसेंबरला मुलुंड येथे एका व्यापाऱ्याच्या घरातून 80 लाख 62 हजारांच्या दागिन्यांची चोरी झाली होती. तपासादरम्यान, हे काम राजेश शेट्टीचं असल्याची माहिती मालमत्ता कक्षाला मिळाली आणि त्यानंतर मालाड येथील एका बारवर पाळत ठेऊन पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणी राजेश शेट्टीकडून सोनं विकत घेणाऱ्या प्रवीण सोनी (40) नावाच्या सोनाराला देखील पोलिसांनी गजाआड केलं आहे.

"राजेश शेट्टी हा सराईत गुन्हेगार असून हत्येच्या एका गुन्ह्यासह एकूण 15 गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. दिवसा घरफोडी करण्यात हा राजेश तरबेज असून आधी तो घरांची रेकी करतो आणि त्यानंतर संधी साधून संपूर्ण घर साफ करतो. विशेष म्हणजे एखादं घर फोडण्यास त्याला फक्त 15 ते 20 मिनिटे लागतात. हे करताना शेजाऱ्यांना देखील खबर लागत नाही " अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त विनयकुमार राठोड यांनी दिली.


पुढील बातमी
इतर बातम्या