एटीएम कार्ड क्लोनिंग प्रकरणी बल्गेरियन नागरिकाला अटक

मुंबईच्या सायबर पोलिसांनी एका बल्गेरियन नागरिकाला अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ऑक्लेन्डो मिखायलो (४०) असं या इसमाचं नाव आहे. त्याच्यावर एटीएम कार्ड्सचं क्लोनिंग करून गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

एप्रिल महिन्यात जुहू येथील एका एटीएम मशीनने एक सोनेरी रंगाचे क्लोन केलेले कार्ड होल्ड करून ठेवले होते. त्यानंतर बँकेने चौकशी केली असता जो इसम या कार्डच्या सहाय्याने पैसे काढले होते त्याने अशा इतरही अनेक क्लोन कार्डच्या मदतीने पैसे काढल्याचे समोर आले. त्यानंतर तत्काळ सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुहू येथील ज्या एटीएम मशीनने हे कार्ड होल्ड करून ठेवले होते, त्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवलं आणि त्या आधारावर पोलीस ऑक्लेन्डो मिखायलोपर्यंत पोहोचले. त्याच्या घराच्या झडतीत पोलिसांनी १ लॅपटॉप, तीन मोबाईल फोन, ३ हार्डडिस्क, ४ डोंगल आणि ८ ब्लँक कार्ड जप्त केल्याची माहिती डीसीपी अखिलेश कुमार सिंग यांनी दिली.

सध्या टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेला ऑक्लेन्डो या आधी देखील २०१४ साली भारतात आला होता. तो याच एटीएम कार्डचा गैरव्यवहार करण्यासाठी भारतात आल्याचा संशय देखील सायबर पोलिसांना आहे. हा ऑक्लेन्डो मिखायलो इतर लोकांच्या कार्डची माहिती चोरून त्याचं क्लोन कार्ड तयार करत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. आत्तापर्यंत नेमकं या ऑक्लेन्डोने किती लोकांना फसवलंय हे स्पष्ट झालं नसलं तरी त्याचा आकडा मोठा असू शकतो. एवढंच नव्हे तर ज्या लोकांना त्याने लुबाडलं आहे ते परदेशी नागरीकही असू शकतात असा पोलिसांना अंदाज आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या