अल्पवयीन मुलांची युरोपमध्ये तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे तिन्ही आरोपी बॉलिवूडमध्ये काम करत असल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणी दरोडा विरोधी पथकाने चार मुलांची सुटका करून 3 तस्करांना अटक केली आहे.
आपल्या मुलाने परदेशात जावे, खूप शिकावे आणि मोठे व्हावे ही सगळ्याच पालकांची इच्छा असते. अशा पालकांना ही टोळी हेरत असे. त्यांना मोठमोठी स्वप्नं ही टोळी दाखवत असे आणि प्रत्येक मुलापाठी 10 लाख रुपये ही टोळी कुटुंबाकडून वसूल करत असे. मुलाच्या भविष्यसाठी पालक ही किंमत मोजत असत. पण प्रत्यक्षात मात्र ही टोळी या मुलांना युरोपात नेऊन गुरुद्वारा सारख्या ठिकाणी सोडून देत असे.ते सुद्धा त्यांच्या शिक्षणाची राहण्या-खाण्याची कोणतीही सोय न करता. मुलांना सोडण्यासाठी बनवलेले पासपोर्ट देखील ही टोळी आपल्या सोबत परत आणत असे.
टोळीचं बॉलिवूड कनेक्शन -
हे तिन्ही आरोपी बॉलिवूडमध्ये काम करत असून, त्यापैकी मुख्य आरोपी आरिफ शफि फरुकी (38) हा बॉलिवूडमध्ये स्टिल फोटोग्राफर आहे. राजेश पवार (47) असिस्टंट कॅमेरामन असून, फातिमा फरिद अहमद (48) ही हेअर स्टाइलिस्ट आहे. मोठमोठ्या कलाकारांसोबत तिने काम केलं असल्याची माहीती तिने तपासादरम्यान दिली.
या तिघांव्यतिरिक्त एक मुख्य आरोपी पंजाबमध्ये आहे. तोअल्पवयीन मुलांना गोळा करत असे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना परदेशामध्ये चांगल्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी नेत असल्याची बतावणी करून आणत असे. पंजाबहून मुंबईला आणून
मग इथून त्यांच्या खोट्या पासपोर्ट आणि व्हिसावर त्यांना युरोपियन देशात नेले जात असे. मिळालेल्या माहितीनुसार 10 लाखात मुलांची तस्करी केली जात असे. पंजाब येथील दलाल 2 लाख स्वत:कडे ठेवून राहिलेले आठ लाख मुंबईतील 3 जणांना द्यायचा. आतापर्यंत 15-20 अल्पवयीन मुलांची तस्करी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.