एकतर्फी प्रेमातून तरुणीला मिठी मारणारा अटकेत

मालाड परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीला भररस्त्यात एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून मिठी मारल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ऐवढंच नाही तरुणीने प्रेमाला होकार न दिल्याने त्याने तिला मारहाणही केली. याप्रकरणी तरुणीने मालाड पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आमीर खान (२०) याला अटक केली आहे.

संपूर्ण प्रकार

मालाड परिसरात पीडित तरुणी ही आपल्या कुटुंबासोबत राहते. मागील अनेक दिवसांपासून आमीर हा तिच्या मागावर होता. महाविद्यालयात येता-जाता तिचा पाठलाग करायचा. त्याकडे तरुणीने वारंवार दुर्लक्ष केलं. मात्र आमीरने ऐकेदिवशी तरुणीला रस्त्यात अडवून तिच्याकडे प्रेमाची विचारणा केली. मात्र तरुणीने त्यास नकार दिला. 

त्यानंतर आमीरने तरुणीचा मोबाइल नंबर मिळवत, तिला फोनवरून त्रास देण्यास सुरुवात केली. मात्र तरुणीने त्याचा मोबाइलनंबर ब्लाॅक केल्यामुळे आमीर चिडला होता. सोमवारी नेहमीप्रमाणे तरुणी महाविद्यालयात आपल्या मैत्रिणीसोबत जात होती. त्यावेळी आमीरने तिचा रस्ता अडवत, तिच्याकडे मोबाइल का उचलत नाही? असं विचारलं. त्यावरून दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. त्यावेळी राग अनावर झालेल्या आमीरने तरुणीला मारहाण केली. तर तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत तिला मिठी मारली.

आरोपीला अटक

तरुणीने आरडा ओरडा केल्यानंतर रस्त्यावरील नागरिक तरुणीच्या मदतीसाठी धावले. तरुणीने आमीर विरोधात मालाड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आमीरविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

पुढील बातमी
इतर बातम्या