कोरोनाचा पाॅझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह दिला, एकाला अटक

कोरोनाचे बनावट अहवाल दिल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अब्दुल साजिद खान असं या आरोपीचं नाव आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

थायरोकेअर टेक्नॉलॉजी कंपनीत विधी कार्यकारी अधिकारी पदावर बिरुदेव सरोदे काम करतात. त्यांच्या कंपनीत सर्विस प्रोव्हायडर क्लाइंटच्या पदावर अब्दुल साजिद खान काम करतो. अब्दुल याने रमेश खबरानी या रुग्णाला त्याच्या रक्त आणि इतर चाचण्यांचा अहवाल येण्यापूर्वी थायरोकेअर टेक्नॉलॉजी कंपनीच्या लेटर हेडवर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं लिहून दिलं होतं. मात्र, खबरानी यांचा खरा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. या प्रकरणात खोटा रिपोर्ट तयार करणे, जागतिक महासाथीच्या नियमांचं उल्लंघन, कंपनीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी अब्दुल साजिद खान याला अटक केली आहे. 

खोटा अहवाल देण्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास आता पोलिस करत आहेत. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर आता कोरोनाचे खोटे रिपोर्ट समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांसाठी यावर नियंत्रण आणण्याचं मोठं आवाहन असणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या