राजगृह येथील बागेत नासधुसप्रकरणी एक संशयीत ताब्यात

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृह या निवासस्थानी मोजतोडप्रकरणी एका संशयिताला माटुंगा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने या संशयिताला ताब्यात घेतले असल्याचे सांगितलेे. या संशयिताकडे पोलिस अधिक चौकशी करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर तेथे पोलिस बंदोबस्त मोठ्याप्रमाणात वाढवण्यता आला आहे.

दादरच्या राजगृहाबाहेर मंगळवारी सायंकाळी 6 च्या सुमारास दोन अनोळखी व्यक्तींनी  फुलझाडांची नासधूस केली. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून पळ काढला. या घटनेची माहिती सोशल मिडियावर वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राजगृहाबाहेर आंबेडकरी अनुयायांनी गर्दी करू नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजगृहाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या परिसरात तीन वायरलेस आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच राजगृह परिसरात येणा-या रस्त्यांवरही बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिसरातील रस्ते वाहतूक सुरू असली तरी वाहनांचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी राजगृह परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज मिळवले असता यातील संशयीताची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले.
 त्यानुसार, पोलिसांनी या संशयीताला ताब्यात घेत चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. 

सीसीटीव्हीत दिसणा-या व्यक्तीशी मिळत्या जुळत्या व्यक्तीने 6जुलैला  दरम्यान पाऊस सुरु असल्याने राजगृह परिसरात आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील सुरक्षा रक्षकाने त्याला हटकले होते,अशी माहिती सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना दिली आहे. त्या अनुषंगाने संशयीत व्यक्तीची चौकशी सुरू आहे.
 राजगृहावरील हल्ला निषेधार्ह आहे. मात्र आंबेडकरी जनतेने संयम बाळगावा. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली असून तपास सुरू आहे. त्यामुळे कुणीही राजगृह परिसरात येऊ नये. तुम्ही राहत असलेल्या जिल्हाधिकारी-तहसिलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करा. पण लॉकडाऊनच्या नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.

 या घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंबेडकर कुटुंबीयांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे दिले असून संबधित माथेफिरू हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर ताब्यात घेतलेल्या संशयीताचा नासधूस करण्यात सहभागआढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले हेत. मालमत्तेत विनापरवानगी शिरणे, मालमत्तेची नासधुस करणे आदी विविध कलमांतर्गत याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे
पुढील बातमी
इतर बातम्या