संजूबाबाविरोधात बोलल्यामुळं जीवे मारण्याची धमकी

  • मुंबई लाइव्ह टीम & वैभव पाटील
  • क्राइम

दिग्दर्शक राज कुमार हिरानी यांचा संजू चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या चांगलीच कमाई करत आहे. मात्र,  या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीकाही केली जात आहे. बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीनं यासंबंधी एक चर्चाही घडवून अाणली. या चर्चेत १९९३ च्या बाॅम्बस्फोटातील पीडित तरुण तुषार देशमुख सहभागी झाला होता.  तुषारनं यावेळी अभिनेता संजय दत्तविरोधात एक भाष्य केलं. त्यानंतर तुषारला एका आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांकावरून जीवे मारण्याचा धमकी देण्यात आली आहे.

वृत्तवाहिनीवर संजय दत्तविरोधात भाष्य

१९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी संजय दत्त याला शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, दिग्दर्शकांनी संजू चित्रपटात संजयची सकारात्मक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संजयच्या याच सकारात्मक बाबींविषयी बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीनं चर्चा घडवून अाणली.  त्यावेळी तुषारला संजू सिनेमाबाबत विचारलं असता, तुषारनं संजय दत्तविरोधात भाष्य केलं. त्यानंतर गुरूवारी सकाळी ११. ४६ वाजताच्या सुमारास आंतराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांकावरून जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आल्याचे तुषारनं मुंबई लाइव्हला सांगितलं.

कोण आहे तुषार देशमुख?

१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात तुषारच्या आईचा मृत्यू झाला. वेळी तुषार  ५ ते ६ वर्षांचा होता. लहानपणीच आईचं छत्र हरपलेल्या तुषारला यातून सावरण्यासाठी अनेक वर्ष लागली. तुषार देशमुख दादर येथे राहत असून तो हॉटेल व्यावसायिक आहे.

  +४४७५३७३२१०१५ या आंतरराष्ट्रीय दुरध्वनी क्रमांकावरून मला कॉल आला असून, 'संजूबाबा के खिलाफ कुछ भी बोला तो, तेरे भी तेरी माँ जैसे तुकडे कर देंगे' अशी धमकी दिली आहे. याआधीही मी याकुब मेमन विरोधात सह्यांची मोहिम राबवली होती. त्या वेळेसही मला धमक्यांचे भरपूर फोन आले होते. त्यामुळं आज आलेल्या फोनच्या विरोधात मी माहीम पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. सुरूवातीला तक्रार नोंदवण्यास पोलीस टाळाटाळ करत होते. परंतू त्यानंतर माझं वरिष्ठांशी बोलण झालं आणि त्यांनी तातडीनं माझ्या तक्रारीची दखल घेतली.

 - तुषार देशमुख


हेही वाचा -

बलात्कार प्रकरणात मिमोह चक्रवर्तीला होणार अटक?

काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींना धमकी देणारा गजाआड


 

पुढील बातमी
इतर बातम्या