मुलुंडमध्ये महिलेच्या सतर्कतेने वाचला जीव

घरातील वृद्धांना एकटे गाठून चोरी करण्याचे प्रमाण वाढत असतानाच मुलुंडमधील एका सतर्क महिलेने अशा चोराला चांगलीच अद्दल घडवली आहे. या महिलेने चोरीची घटना टाळण्यासोबतच दोघींचे जीवही वाचवले आहेत.

मुलुंडच्या मंदार सोसायटीत राहणाऱ्या वाणगे कुटुंबीयांच्या घरी शनिवारी दुपारी एक भामटा घुसला. यावेळी घरात 77 वर्षांच्या संध्या वाणगे उपस्थित होत्या. आपण महानगर गॅसकडून आलो आहोत, असे सांगून त्याने मीटर रीडिंग घेण्याच्या बहाण्याने किचनमध्ये प्रवेश केला. तेथे त्याने संध्या वाणगे यांना घरात कुणी पुरूष आहे का? असे विचारले.

घरात आपल्याशिवाय अन्य कुणीही नसल्याचे आजींनी या भामट्याला सांगताच त्याने चाकू काढून थेट आजींच्या गळ्याला लावला. या प्रकाराने घाबरलेल्या आजींनी आरडाओरड करताच बेडरूममध्ये असलेल्या त्यांच्या सूनबाई नीलम वाणगे धावत आल्या. त्यांनी आजींना ओढून बेडरूममध्ये नेले आणि दार आतून बंद करत शेजाऱ्यांना मदतीसाठी आवाज देण्यास सुरूवात केली.

नीलम यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा भामटा घाबरला आणि त्याने तेथून पळ काढला. मात्र पळ काढताना त्याचा मोबाइल फोन वाणगे यांच्या घरातच पडला. त्यानंतर शेजारच्यांनी नियंत्रण कक्षाद्वारे नवघर पोलिसांकडे त्वरीत तक्रार नोंदवली. पोलिसांनी अवघ्या तासाभरात तपास करून या चोराला अटक केली. सुभाष सोनावणे असे या चोराचे नाव असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या