प्राचीन मूर्तींची तस्करी करणारा गजाआड

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मुंबई - पौराणिक मूर्तींची तस्करी करणाऱ्या व्यक्तीला अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. विजय नंदा असे या अमेरिकन व्यापाऱ्याचे नाव असून, त्याच्याकडून 6 पौराणिक मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत.

सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने विजय नंदा याच्या भायखळ्यातील गोडाऊनवर छापा मारून पौराणिक मूर्ती जप्त केल्या. विशेष म्हणजे कोणतीही कागदपत्रे त्याच्याकडे नसल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे.

गोडाऊनमधून पहिल्या शतकातील भांडी, 17 आणि 18 व्या शतकातील गणपती बाप्पा आणि महिषासूर मर्दिनीच्या तांब्याच्या मूर्ती आणि दगडात कोरण्यात आलेल्या देवी देवतांच्या मूर्ती जप्त करण्यात आल्या आहेत. दहाव्या आणि अकराव्या शतकातील उत्तरेकडील तसेच दक्षिणेकडील मंदिरांना तोडून या पौराणिक मूर्ती चोरण्यात आल्याचा अंमलबजावणी संचानालयाला संशय आहे.

काही दिवसांपूर्वीच नंदा हा अमेरिकेतून भारतात आला होता. या सगळ्या पौराणिक मूर्तींना देशाबाहेर तस्करी करण्यासाठी तोच आल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतातील पौराणिक मूर्तींना परदेशात चांगली किंमत असून, त्या चोरून त्यांची कागदपत्रे बनवून ती देशाबाहेर नेली जातात आणि मग चढ्या भावाने त्यांना विकण्यात येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीनंतर अशा पौराणिक मूर्तींचा नामचीन तस्कर सुभाष कपूर याला भारताच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यावेळी अश्या २००० पौराणिक मूर्तींची घरवापसी देखील झाली होती.

पुढील बातमी
इतर बातम्या