मुंबई उच्च न्यायालयाचा आर्यन खानला मोठा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात जामिनावर असलेल्या आर्यन खानला मोठा दिलासा दिला आहे. आठवड्याच्या दर शुक्रवारी आर्यन खानला एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट घालण्यात आलेली अट आता शिथिल करण्यात आली आहे.

क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास आता एनसीबीच्या दिल्ली एसआयटीकडे गेला आहे. त्यामुळं आता दर आठवड्याला शुक्रवारी आर्यनला एनसीबी मुंबईच्या कार्यालयात हजेरी लावण्याची आवश्यकता नाही, असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

आर्यन खान याला मुंबईतील क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात अनेक अटींवर जामीन मंजूर केला होता. या अटींमध्ये काही प्रमाणात सूट आणि शिथिलता देण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका आर्यननं हायकोर्टात केली होती.

यावर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानं आर्यन खानला मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणाचा तपास आता एनसीबीच्या दिल्ली एसआयटीकडे गेल्यानं आता दर आठवड्यात शुक्रवारी आर्यनला मुंबई एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची आवश्यकता नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

आर्यनला चौकशीसाठी बोलवायचे असल्यास एनसीबीने त्याला आगाऊ नोटीस द्यावी, किमान ७२ तास आधी नोटीस द्यावी, असे निर्देश न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी दिले. दर शुक्रवारी एनसीबी मुंबई कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथिल करून जामिनाच्या आदेशात बदल करावा, अशी विनंती आर्यनने अर्जात केली होती.

न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनीच आर्यनला वेगवेगळ्या १३ अटी घालून २८ ऑक्टोबरला जामीन मंजूर केला होता. मुंबईबाहेर जायचे असल्यास आर्यनला प्रवास आणि मुंबईबाहेरील निवासाचा संपूर्ण तपशील एनसीबी एसआयटीला द्यावे लागेल, असेही मुंबई हायकोर्टाने सुधारित आदेशात स्पष्ट केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या