अनिल देशमुखांची ४ कोटींची संपत्ती जप्त, ईडीची कारवाई

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. ईडीने देशमुख कुटुंबियांची मुंबई आणि उरणमधील मालमत्ता जप्त केली आहे.

या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे. अनिल देशमुख यांचा वरळीमधला एक फ्लॅट आणि उरणमधील एका जमिनीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. वरळीतील फ्लॅटची किंमत ही 1 कोटी  54 लाख रुपये आहे. तर उरणमधील जमिनीची किंमत 2 कोटी 67 लाख रुपये आहे.

ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण प्रकृतीचं कारण देऊन ते चौकशीला हजर राहिले नव्हते. ईडीने देशमुखांच्या दोन सचिवांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने देशमुख यांची मालमत्ता जप्त केली आहे.

वरळी येथील फ्लॅट आरती देशमुख यांच्या नावावर आहे. २००४ मध्ये या फ्लॅटची पूर्ण रक्कम रोकड स्वरूपात देण्यात आली होती. प्रत्यक्षात फेब्रुवारी २०२० मध्ये अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना या फ्लॅटचा विक्री व्यवहार करण्यात आला, असे ईडीच्या तपासात आढळले आहे.

अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी सचिन वाझेच्या माध्यमातून ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून ४.७० कोटी इतकी रक्कम लाच स्वरूपात मिळवल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचा दावाही ईडीने केला आहे.

दिल्ली स्थित डमी कंपन्यांच्या मदतीने देशमुख यांनी मनी लाँड्रिंगच्या माध्यमातून ४.१८ कोटी रुपये आपल्या ट्रस्टसाठी मिळवले. ही रक्कम श्री साई शिक्षण संस्थेच्या खात्यात दाखवण्यात आली, असा दावाही ईडीकडून करण्यात आला आहे. देशमुख कुटुंबीयांकडे प्रीमियर पोर्ट लिंक्स कंपनीची ५० टक्के मालकी आहे. या कंपनीच्या नावे जमीन, दुकाने अशी मिळून ५.३४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. या कंपनीची मालकी देशमुख कुटुंबाने केवळ १७.९५ लाख रुपयांच्या बदल्यात मिळवल्याचा दावाही ईडीकडून करण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या