शहरातील ९ पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुण्याच्या भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ मंगळवारी आणि बुधवारी दलित संघटनांनी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यावेळी कायदा हातात घेणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ९ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून १०० हून अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे. घाटकोपर, गोरेगाव, वरळी, वडाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरलेले पहायला मिळत आहेत. 

आंदोलनकर्त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते अडवून ठेवल्याने त्या-त्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. तर वांद्र्याच्या कलानगर परिसरात आंदोलनकर्त्यांनी पश्चिम द्रूतगती मार्ग अडवून धरल्याने पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक बंद केली आहे. चेंबूर परिसरात काही अज्ञातांनी सकाळी दोन स्कूल व्हॅन तोडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. 

ठिकठिकाणी पोलीस वाढीव कूमक मागवून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असून सोशल मीडियावरील अफवांना बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे. तसेच सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टकरून नागरिकांची डोकी भडकवणाऱ्यांवर सायबर पोलीस लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या