उभ्या उभ्या पेटली बाईक!

सायन-पनवेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शीव हॉस्पिटल जंक्शनवर भरधाव वेगात येणाऱ्या एका बाईकने पेट घेल्याने एकच खळबळ उडाली. एमएम 01 एजी 7127 या अॅक्टिव्हा बाईकने सोमवारी दुपारी अचानक पेट घेतला. विशेष म्हणजे पोलिसांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी चालकाला ताब्यात घेतलं असून आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

धारावीतल्या 90 फूट रस्त्यावर राहणारे हैदरअली जाहिदली (55) आपल्या दुचाकीच्या दुरुस्तीचे काम आटोपून पेट्रोल भरण्यासाठी सायन पेट्रोल पंपाकडे निघाले होते. सायन हॉस्पिटल जंक्शन सिग्नलवर ते थांबले असता मागील मागून येणाऱ्या चालकाने त्यांच्या दुचाकीतून धूर येत असल्याचे सांगितले. हे कळताच जाहिदली रस्त्यातच गाडी सोडून पळाले. त्यावेळी जंक्शनवर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांची नजर त्या दुचाकीवर पडली. 

वाहतूक पोलिसांनी तात्काळ दुचाकी रस्त्याच्या कडेला नेली असता धुराचा डोंब उसळला आणि दुचाकीने पेट घेतला. माटुंगा वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद सूळ यांनी अग्निशमन दलाला तात्काळ कळविले. मात्र अग्निशमन दलाच्या गाडीला पोहोचण्यास उशीर होत असल्याचे पाहून सूळ यांनी रस्त्यावरून जाणारा पाण्याचा टँकर अडवला आणि टँकरच्या पाण्याने आग विझवली. यावेळी माटुंगा वाहतूक विभागाचे रायडर अजर नागरजी, सानप, खंडागळे, कदम, पोलीस शिपाई बडे यांनी या कारवाईत मोलाची भूमिका बजावली. या जंक्शनवरुन काही अंतरावर पेट्रोल पंप असल्याने सुदैवाने मोठी हानी टळली.

पुढील बातमी
इतर बातम्या