भाजप आमदाराविरोधात धमकीप्रकरणी गुन्हा

इमारत बांधकाम कंत्राटदाराला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणधीर सावरकर असे या आमदारांचे नाव असून ते भाजपचे अकोल्याचे आमदार आहेत. सावरकर यांच्यासोबतच बळवंत मल्ले, प्रकाश पोहरे, ऋषिकेश पोहरे, अनुप धोत्रे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करत विक्रोळी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन काळे(वय ३८) हे व्यावसायिक असून त्यांनी रायगड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम हाती घेतले होते. मेसर्स धनलक्ष्मी बिल्डटेक कंपनीमध्ये काळे यांची भागीदारी आहे. संबंधित इमारतीचे बहुतांश काम पूर्ण झाल्यानंतर काळेंनी या कामाच्या ६ कोटी ५० लाखांच्या बिलाची रक्कम मिळावी यासाठी अर्ज केला. मात्र यावेळी भाजप आमदार रणधीर सावरकर आणि बळवंत मल्ले यांनी नकार देत उलट काळे यांनाच शिवीगाळ केली. तसेच शस्त्र काढून काळेंना जीवे मारण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी काळे यांनी विक्रोळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच, यापूर्वीही बिलाची दिलेली रक्कम अर्धवट असल्याचा आरोप काळेंनी केला आहे. याप्रकरणात गुन्हा नोंद करुन पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या