शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशी हायकोर्टाकडून रद्द

मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी गुरूवारी मुंबई हायकोर्टानं मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टानं ३ आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केलं आहे. शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या तिघांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती.

२०१३ मधील या प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. घटना घडली तेव्हा लोकांचा रोष अधिक होता. पण कायद्याचा विचार करता हे प्रकरण फाशीचे नाही असं कोर्टानं यावेळी नमूद केलं.

आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयानं ४ डिसेंबर २०१४ ला या सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली होती. आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंबंधीचा निर्णय हायकोर्टानं राखून ठेवला होता. दरम्यान गुरूवारी निर्णय सुनावताना कोर्टाने फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्याचा निर्णय दिला.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ ला एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. छायाचित्रकार असणारी महिला आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. यावेळी ५ जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता.हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापची लाट उसळली होती. पोलिसांनी याप्रकरणी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. कोर्टाने सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या