चंदा कोचर यांच्याविरुद्ध लूक आऊट नोटीस जारी

पदाचा गैरवापर करत कर्ज दिल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्या विरोधात सीबीआयनं लूक आऊट नोटीस जारी केली आहे. काही दिवसांपूर्वीच चंदा कोचर यांच्यावर सीबीआयनं गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत, नरीमन पाँईट, वांद्रे आणि औरंगाबाद इथं छापेमारी केली होती. चंदा कोचर या देश सोडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सीबीआयनं सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला चंदा कोचर यांनी देश सोडून जाण्याचा प्रयत्न केल्यास तशी माहिती आम्हाला दिली जावी असं सांगितलं आहे.

कोचर या बँकेच्या कार्यकारी संचालक आणि सीईओ असताना, व्हिडीओकॉन कंपनीच्या पदाचा गैरवापर करत 3 हजार 250 कोटींचं कर्ज  दिलं. हे कर्ज देताना कोचर यांनी व्यक्तिगत हित बघितलं आणि त्याचा फायदा घेतला असा त्यांच्यावर आरोप होता. चंदा कोचर यांना कर्ज प्रकरण भोवलं आणि आयसीआय बँकेच्या पदावरून पायउतार व्हावं लागलं होतं.  जून महिन्यापासून त्या सक्तीच्या रजेवर होत्या. बँकेच्या संचालक मंडळाचा आणि शेअर धारकांचा दबाव असल्यानं शेवटी त्यांनी संचालक मंडळाकडे निवृत्तीचा अर्ज केला आणि सर्व पदांचे राजीनामे देत असल्याचं कळवलं होतं.

व्हिडीओकॉन कंपनीनं ते कर्ज बुडवलं. ही माहिती बाहेर आल्यानंतर कोचर यांच्या कार्यपद्धतीवर आणि हेतूवरच टीका होऊ लागली. या प्रकरणी सीबीआयनं आज व्हिडिओकॉन कंपनीच्या मुंबई आणि औरंगाबाद इथे छापे टाकत काही महत्वाची मालमत्ता हस्तगत केली आहे. लवकरच सीबीआय चंदा कोचर, दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांना चौकशीसाठी बोलावणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या