मूव्हर्स अँड पॅकर्सने सामान पाठवताय? मग सावधान!

जर तुम्ही तुमचे सामान मूव्हर्स अॅण्ड पॅकर्सच्या मदतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवत असाल तर जरा जपून! कारण बनावट बिल दाखवून आणि खोटा पत्ता सांगून तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे सर्वात आधी तुमचे बिल किती आहे आणि त्यावर तुमच्याच घरचा पत्ता आहे का? याची खात्री करून घ्या. कारण अशा प्रकारे लोकांची फसवणूक करून त्यांना लाखोंचा चुना लावणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी कांदिवलीच्या चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली आहे.  

फसवणूक करणाऱ्या या टोळीसंदर्भात चारकोप पोलिसांनी माहिती उघड केली आहे. या टोळीने चारकोपमध्ये राहणाऱ्या चांदनी छेडा आणि घाटकोपरचे रहिवासी चेतन परमार यांची फसवणूक केली आहे. या टोळीने आधी त्यांच्याकडून सामान कुठे पाठवण्याचे बुकिंग करून घेतले होते. त्यानंतर या टोळीने पीडित व्यक्तींचे सामान कच्छ (गुजरात) आणि वडोदरा येथे पाठवण्याऐवजी वसईच्या नायगावमध्ये नेले. त्यानंतर त्या वस्तूंना बाजारात किंवा दलालाच्या माध्यमातून विकले. फसवणूक करणाऱ्या या टोळीकडून पोलिसांनी 9 लाख रुपयांचे सामान जप्त केले आहे. सध्या या टोळीतील तिघे आरोपी पोलिसांच्या तावडीत आहेत. मूव्हर्स अँड पॅकर्सची बोगस कंपनी उघडून या तिघांनी अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याचं उघड झालं आहे.      

गुजरातच्या कच्छमध्ये कपड्याचा व्यापार करणाऱ्या पीडित चांदनी छेडा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे यांनी 25 एप्रिलला जस्ट डायल कंपनीकडून गोपाल कृष्ण पॅकर्स कंपनीचा नंबर घेतला होता. त्यांनतर 30 एप्रिलला त्यांनी गोपाल कृष्ण पॅकर्स कंपनीला फोन केला. तेव्हा त्यांना 10 हजाराच्या सामानामागे एक हजाराची सूट मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी 9 हजार रुपये देऊन टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि घरच्या वापराचे काही सामान चारकोपहून कच्छला राहणाऱ्या त्यांच्या आईच्या घरी पाठवण्यास सांगितले. पण सामान पोहचले का? याची खात्री करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा गोपाल कृष्ण पॅकर्स कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी कंपनीचा मोबाईल बंद होता. तसेच सामान देखील तीन ते चार दिवसांपासून पोहोचले नव्हते. ज्यानंतर चांदनी यांचा संशय बळावला आणि त्यांनी यासंदर्भात चारकोप पोलिसात तक्रार दाखल केली. या टोळीने अशाच प्रकारे आणखी दोघांचीही फसवणूक केल्याची माहिती उघडकीस आली आहे.  

चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत ही टोळी आणखी दोघांची फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा आणि शहरातील सर्व मूव्हर्स अँड पॅकर्स कंपनीचे नंबर मिळवत पोलिसांनी बारकाईने तपास करण्यास सुरुवात केली. चौकशीदरम्यान विक्रोळी आणि घाटकोपरमधील मूव्हर्स अँड पॅकर्स या बनावट कंपनीकडून फसवणूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना शहरातील विविध ठिकाणांहून अटक केली.  

यामध्ये आरोपी गोपाळ विश्नोई (19) याचा समावेश आहे. गोपाळला पोलिसांनी 12 मे रोजी नायगावहून अटक केली होती, ज्याने गोपाल कृष्णा पॅकर्स नावाची बनावट कंपनी उघडली होती. पोलिसांनी अटक केलेल्या तिनही आरोपींविरोधात भादंवि कलम 408, 420 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करत न्यायालयात हजर केले असता आरोपींची 20 मेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या