'यूपी'ला जाण्यासाठी 3 ट्रकमध्ये 160 जण कोंबले, चालकांना अटक

देशांत कोरोनाच्या संकटाने धुमाकुळ घातला असुन, या संकटाला हरविण्यासाठी संपूर्ण देशांत लाॅकडाऊन घोषीत केला आहे. अशातच कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या मुंबईतील नागरीकाना उत्तर प्रदेशला घेऊन निघालेले तीन ट्रक रफी किडवाई मार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. तर याप्रकरणी चालक -वाहकांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

तरबेज सुलेमान (25), मोहमद वसीम मो हुसेन चौधरी (50), धर्मेंद्र कुमार छोटेलाल हरिजन (32), क्लिनर सैफउद्दीन इस्माईल खान (25) यांना अटक केली आहे. आर.ए. के.मार्ग पोलीस ठाणे अंतर्गत ज्ञानेश्वर नगर जंकशन याठिकाणी नाकाबंदी चालू असताना तीन ट्रक  एका मागोमाग येत होते. नाकाबंदीवर असलेल्या पोलिस पथकाने  त्यांना पाहिले असता ते ट्रक बंदिस्त असल्याने यावेळी पोलिसांना संशय आला. त्यांना थांबवून पाहणी केली असता त्या वाहनांमधून एकूण 160 नागरीकांची मुंबई ते उत्तर प्रदेश  अशी बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. यावेळी तात्काळ प्रवाशांना आणि वाहन चालकांना त्यांचे व्हॅनसह ताब्यात घेतले. या सर्वावर कोरोनामुळे त मुंबई मध्ये आणि देशात लॉकडाऊन असताना त्याचा भंग करून विनापरवाना लोकांची वाहतूक केली म्हणून आर ए के मार्ग पोलीस ठाणे गुन्हा दाखल केला. तर याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्व परप्रांतीय नागरीकांच्या खाण्याची व पिण्याची व्यवस्था केली आहे. आरोपींनी त्यांच्याकडून प्रत्येकी चार हजार रुपये घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. यापूर्वीही आरएके मार्ग पोलिसांनी एक ट्रक ताब्यात घेतला होता. त्यात 40 नागरीक होते. ते सर्वजण उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथे जात होते. आरएके मार्ग पोलिसांच्या हद्दीत मुंबई बाहेर जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे त्यांनी या परिसरात नाकाबंदी लावली असून संशयीत गाड्या अडवून त्यांची तपासणी सुरू आहे
पुढील बातमी
इतर बातम्या