लॉकडाऊनमध्ये दारुविक्री बंद असल्याने दारु शौकीन आणि तळीरामांची तडफड सुरु होती. माञ दारूविक्रीला परवानगी देताच, वाईन शाँप वाल्यांनी घरपोच डिलेव्हरी देण्यास सुरूवात केल्याने नागरिक ऑनलाईन पद्धतीने दारुची ऑर्डर देऊन घरीच दारु पिण्याचा बेत आखतात. मात्र ऑनलाईन पद्धतीने दारु मागवणे तुम्हाला महागात पडू शकते.ऑनलाईन दारुविक्रीच्या नावाखाली फसवणुकीचा नवा फंडा भामट्यांनी सुरु केला आहे. अशा भामट्यांचे 73 फोननंबर पोलिसांनी जाहिर केले असून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
नुकताच असा प्रकार अंधेरीत राहणाऱ्या एका तरुणासोबत घडला. तक्रारदार हा एका मोबाईल सर्व्हिस स्टोअर्समध्ये अधिकारी आहे. या व्यक्तीने वाईन घरपोच करणाऱ्या दुकानांचा इंटरनेटवर शोध घेतला. त्याला अंधेरीतील एका वाईन शॉपचा दूरध्वनी क्रमांक आढळला. त्याने दूरध्वनी करून वाईन मागवली व "कॅश ऑन डिलिव्हरी' पर्याय निवडला. परंतु, या पद्धतीने पैसे स्वीकारणे बंद केल्याचे त्याला सांगून क्रेडिट कार्डची माहिती व ओटीपी असा तपशील घेण्यात आला. यापूर्वीही तेथून वाईन मागवल्यामुळे शंका आली नाही, ओटीपी शेअर करताच तक्रारदाराच्या मोबाइलवर एका मागोमाग एक पैसे काढण्यात आल्याचे मेसेज येऊ लागले.
अशा घटनांना सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात घडत आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा वांद्रे पोलिसांनी पर्दाफाश केला होता.त्यावेळी हे गुन्हे रोखण्यासाठी पश्चिम उपनगरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातून एक अधिकारी निवडत विशेष पथक नेमत अशा फसवणूकीच्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवून होते. यातूनच त्यांची मेहनत कामी आली. पोलिसांनी राजस्थानहून एकाला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकार थांबवण्यासाठी स्वत:च आँनलाईन दारू विक्रीसाठी दिसणाऱ्या बोगस वाईन शाँपच्या नंबर खाली खासगीतून प्रतिक्रिया देत, या साईटहून मद्यविक्री न करण्याचे आवाहन केले होते.