परदेशी नागरिकांच्या खात्यावर सायबर चोरट्यांचा डल्ला

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्राइम

ई-मेल हॅक करून परदेशी नागरिकाच्या खात्यातून लाखो रुपये लंपास केल्याचा प्रकार उघड झाला अाहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन विविध खात्यात ही रक्कम जमा केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

१३ लाखांचे उरले फक्त ६५० रुपये

तक्रारदार पंकज शहा हे अनिवासी भारतीय सध्या अमेरिकेत वास्तव्याला आहेत. त्यांचे व पत्नीच्या नावाचे एका खासगी बँकेत संयुक्त खाते आहे. जानेवारीच्या शेवटच्या महिन्यात त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यातून रक्कम निघाली नाही. १३ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम खात्यात असताना बॅलन्स तपासल्यावर त्यांच्या खात्यात फक्त ६५० रुपये असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला.

दोन खात्यांत वळते झाले पैसे

२१ जानेवारीला सात लाख, २३ जानेवारीला पाच लाख ५० हजार व २७ जानेवारीला ५० हजार रुपये आरटीजीएस व एनएएफटीच्या माध्यमातून दुस-या खात्यांमध्ये वळती करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार माहिती घेतली असता त्यांच्या अधिकृत ईमेल आयडीवरून बँकेला ई-मेल आला होता. त्यात त्यांचा अधिकृत ई-मेल बदलण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्याच्या सहाय्याने आरोपींनी शहा यांच्या खात्यातून नेट बँकिंगच्या सहाय्याने ही रक्कम काढल्याचा संशय आहे. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी फसवणूक व बनावटीकरणासह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक गैरवापर कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या