निर्बंधातही ठाण्यात डान्स बार सुरू, दोन पोलीस अधिकारी निलंबित

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू आहेत. दुपारी चारनंतर दुकानं बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र तरीही ठाण्यात डान्स बार सुरू असल्याचं समोर आलं आहे. याची माहिती मिळताच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी गंभीर दखल घेतली. याप्रकरणी आयुक्त जयजित सिंह यांनी दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित केलं आहे. नौपाडा आणि वर्तकनगर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची ठाणे शहर नियंत्रण कक्षामध्ये बदली करण्यात आली आहे. 

ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाणे हद्दीत आम्रपाली आणि अँटीक पॅलेस या दोन डान्सबारसह वर्तकनगर येथील नटराज डान्स बार निर्बंध असतानाही सुरू होते. एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग आॅपरेशनचा व्हिडीओ व्हायरला झाला आहे. 

याची गंभीर दखल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले. ठाण्याच्या आयुक्तांनी प्राथमिक चौकशीच्या आधारे नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना निलंबित केले. 

तर नौपाडा विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी आणि वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांचीही कर्तव्यात कसूर केल्याने ठाणे शहर नियंत्रण कक्षामध्ये बदली केली आहे. तर आम्रपाली, अँटीक पॅलेस आणि नटराज या तिन्ही बारचा परवानाही रद्द करण्यात आला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या