मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरातही नरबळी?

नरबळीचा प्रकार फक्त खेड्यापाड्यात चालतो असा काहींचा समज असतो. मात्र मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरातदेखील नरबळीची घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आरे कॉलनीमध्ये नरबळीनेच एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

बिबट्या किंवा इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आरे कॉलनीतील 3 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी स्थानिकांचं मत काही वेगळंच आहे. ज्यापद्धतीने दर्शिनी मुत्थु वेली(3) चा मृतदेह सापडला आहे त्यावरून तिला कुणी वन्य प्राण्याने मारले नसून, तिची हत्या झाल्याचं एका रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे. जनावरे अशा प्रकारे खात नसल्याचा दावा देखील या रहिवाशाने केला आहे. एवढंच नव्हे तर मृतदेह जाळल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय.

डिसेंबर महिन्यात आरे कॉलनीच्या जंगलात गेलेल्या 22 वर्षीय ब्रेंडन गोन्साल्विसचा शिरच्छेद करून हत्या करण्यात आली होती. ब्रेंडनच्या कपाळावर काही विशिष्ट खुणा आढळल्या होत्या त्यावरून हा नरबळीचा प्रकार असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात होता. या घटनेला तब्बल 5 महिने उलटूनसुद्धा अद्याप या हत्येचं कोड सुटलेलं नाही.

त्यातच सोमवारी रात्री दर्शनी शेजाऱ्यांकडे खेळण्यासाठी गेली होती. रात्री ती शेजाऱ्यांकडून आपल्या घरी येण्यासाठी निघाली देखील. पण त्यानंतर ती अचानक बेपत्ता झाली. घरच्यांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण दर्शिनी काही सापडली नाही. शेवटी बुधवारी दुपारी आरे कॉलनीच्याच जंगलात तिच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. त्यामुळे हा नरबळी आहे का? असा संशय व्यक्त होत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या