प्रधान सचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर

लॉकडाऊनच्या काळात डीएचएफएलचे संस्थापक कपिल वाधवान आणि त्यांचे कुटुंबिय महाबळेश्वरला गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वाधवान यांना महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणे गृह मंत्रालयाच्या विशेष प्रधान सचिवांना चांगलेच भोवले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्याविरोधात कारवाई करत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

वाधवान कुटुंबातील २३ जणांना खंडाळ्यावरुन महाबळेश्वरला जाण्यासाठी प्रवासाची सवलत देणारे पत्र विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी जारी केले होते. लॉकडाऊनमध्ये सुद्धा वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरमध्ये दाखल झाल्यामुळे यावरुन एकच खळबळ उडाली होती. गुप्ता यांनी वाधवान कुटुंबियांना मदत केल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत ट्विट करत कायदा सर्वांसाठी समान असल्याचे नमूद केले. विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. वाधवान कुटुंबातील २३ लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार आहे. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत अमिताभ गुप्तांना सक्तीच्या रजेवरच रहावे लागणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या