लॉकडाऊनमध्ये नशेखोरांना अंमली पदार्थ पुरवणाऱ्या तस्करास अटक

मुंबईत लाँकडाऊनमुळे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यंाची चांगलीच वाताहात झाल्याचे पहायला मिळते. म्हणूनच की काय याचा फायदा घेत तस्करांनी तिप्पट किॆमतीने अंमली पदार्थांची विक्री करण्यास सुरूवात केल्याचे एका गुन्ह्यातून पुढे आले आहे. डीआरआयच्या पोलिसांनी मालाडच्या एका तस्करासा तब्बल 35 लाखांच्या ड्रग्जसह रंगेहाथ अटक केली आहे. लॉकडाऊनमध्ये ड्रग्सचा तुडवडा निर्माण झाल्याच्या संधीचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने ड्रग्सची विक्री करत असल्याची कबूली त्याने दिली आहे.

मालाड पश्चिम येथील एका उच्चभ्रू हाऊसिंग सोसायटीमध्ये पार्क केलेल्या टोयोटा इनोव्हा कारमध्ये महागडी ड्रग्स लपवण्यात आल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार गाडीचा मालक रोहन गावन्स याच्या उपस्थितीत कारची झडती घेण्यात आली. त्यात 340 ग्रॅम मेथाएम्फेटामाईन सापडले. कारच्या अतिरिक्त टायरमध्ये जागा बनवून हे ड्रग्स लपवण्यात आले होते. त्यानंतर याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीनुसार आरोपी नियमीत बाहेर पडून ड्रग्सचे वितरण करत असल्याचे निष्पन्न झाले. लॉकडाऊनमध्ये सर्वच यंत्रणा कोरोनाविषयी विविध जबाबदारी-या पार पाडत असताना आरोपी  तीन ते चार पटीने अधिक रक्कम घेऊन या मालाची विक्री करत होता.

डीआरआयने महाड येथील आरोपीच्या कारखान्यावरही छापा टाकला असून तेथून मोठ्याप्रमाणात ड्रग्स बनवण्याचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. हा सराईत आरोपी असून यापूर्वीही 18 जुलै 2017 मध्ये  25 किलो मेफेड्रॉन तस्करीप्रकरणी आरोपीला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई विमानतळावरूनअटक केली होती. तो परदेशा पळण्याच्या तयारीत होता. त्यावेळी इमिग्रेशन अधिका-यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर 17 महिने तो कारागृहात होता. त्यानंतर जामिनावर तो बाहेर आला होता.
आरोपी हा महाराष्ट्र व गोव्यातील तस्कर नेटवर्कमधील मोठा प्लेअर असल्याचे डीआरआयच्या अधिका-याने सांगितले.

त्याच्याविरोधात मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक, केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक व डीआरआयमध्ये गुन्हे आहेत. त्याच्या बँक खात्यातील व्यवहार व मोबाईवरून केलेल्या संपर्कावरून त्याचे साथीदार व ग्राहकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मॅच बेटींग व फिक्सिंग रॅकेटशीही तो संबंधीत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिका-यांना मिळाली होती. पण तसा कोणताही पुरावा अद्याप हाती लागलेला नसल्याचे अधिका-याने सांगितले. आरोपीला अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयने 13 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या