मुंबईत रेल्वे स्टेशनवर एक्स बॉयफ्रेंडने रेझरने चिरला महिलेचा गळा

मुंबईतल्या डॉकयार्ड रोड रेल्वे स्टेशनवर एका २३ वर्षीय तरुणाने एका महिलेचा गळा चिरल्याची घटना घडली. या तरुणाला पोलिसांनी नवी मुंबई भागातून अटक केली आहे. वेळीच हा प्रकार मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याच्या लक्षात आल्यामुळे त्याने महिलेचे प्राण वाचवले, मात्र तिची प्रकृती गंभीर आहे.

ही घटना रेल्वे स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेनंतर अवघ्या ४८ तासात २३ वर्षीय आरोपी मोहित आगळे याला सीबीडी बेलापूर भागातून अटक करण्यात आली. हल्ला झालेली २१ वर्षीय महिला विधवा असून तिला चार वर्षांची मुलगी आहे.

महिलेचे इतर कोणासोबत अफेअर असल्याच्या संशयातून हा हल्ला केल्याची कबुली आरोपीने दिली असून हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचंही त्यानं सांगितलं. पीडित महिलेची प्रकृती गंभीर आहे. पीडित महिला आणि आरोपी हे पुण्यातील तळेगाव भागात शेजारी-शेजारी राहत होते.

अडीच वर्षांच्या ओळखीनंतर दोघांचे काही काळ एकमेकांशी जवळचे संबंध होते, असंही पोलिसांनी सांगितलं. मात्र वारंवार होणाऱ्या वादांनंतर महिलेने आरोपीशी सगळे संबंध तोडले आणि मुंबईतील शिवडी भागात राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी ती चार महिन्यांपासून राहायला आली होती.

आरोपी तिला वारंवार फोन करायचा, मात्र ती उत्तर द्यायची नाही. एकदा तिने फोन उचलला, तेव्हा आरोपीने तिला एकदाच वडाळा रेल्वे स्टेशनवर भेटायला येण्याची विनंती केली. अखेर, एक जानेवारीला ही महिला बुरखा घालून त्याला भेटायला आली. तिच्यासोबत तिची मुलगीही होती. मोहितने तिला पुन्हा आपल्यासोबत येण्याची विनवणी केली, त्यावरुन दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.

वडाळा स्टेशनवरुन तिने ट्रेन पकडली आणि ती निघाली. पण आरोपीने तिचा पाठलाग केला आणि डॉकयार्ड रोड स्टेशनवर उतरण्यास भाग पाडलं. संध्याकाळी ७:३० वाजताच्या सुमारास महिला तिकीट बुकिंग ऑफिसजवळ स्टीलच्या बेंचवर बसली होती. तिच्या मांडीवर तिची मुलगी बसली होती. ट्रेनच्या डब्यापासून सुरु झालेला वाद डॉकयार्ड रोड स्टेशनवरही सुरुच होता. महिलेचं लक्ष नसल्याची संधी साधून त्याने स्वतःजवळ बाळगलेल्या रेझरने तिचा गळा चिरला.

महिलेने आरडाओरड करताच मध्य रेल्वेचे बुकिंग क्लार्क आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान धावत आले. प्रथमोपचार करुन तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्या मुलीला कुठलीही दुखापत झालेली नाही. पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून लहान मुलीला त्यांच्या ताब्यात दिलं.

पुढील बातमी
इतर बातम्या