आयपीएलच्या बनावट तिकिटांची विक्री

सध्या आयपीएल सामन्यांची धूम सुरु आहे. सामने अनेकदा हाऊसफुल्लही होतात. मात्र तु्म्ही खरेदी करत असलेली तिकिटं बनावटही असू शकतात. अगदी असाच काहीसा प्रकार मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये समोर आला आहे. सोमवारी वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि आरसीबी संघांमध्ये मॅच होती. मात्र याच मॅचची बनावट तिकिटं विकून तब्बल २६ जणांची फसवणूक झालीये.

मुंबईसह, सुरत, सोलापूर आणि कोल्हापूर अशा विविध भागांतून आलेल्या तरुणांना दोन दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडियम परिसरात काही अज्ञात व्यक्तींनी ही तिकिटे विकली होती. पण प्रत्यक्षात हे 26 तरुण जेव्हा मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये गेले तेव्हा त्यांची तिकिटे स्कॅनच झाली नाहीत. आपल्याला विकलेली तिकिटं बनावट असल्याचं या तरुणांना लक्षात आल्यानंतर त्यांनी मरीन ड्राईव्ह पोलिसात तक्रार दाखल केली.

मरीन ड्राईव्ह पोलिसांनी या सर्व 26 तरुणांची तक्रार दाखल करुन घेत पुढील तपास सुरू केला आहे. धक्कादायक म्हणजे मरीन ड्राईव्ह पोलिसांचा वानखेडे स्टेडियमजवळ कडक पहारा असतानाही बनावट तिकिटं कशी विकली गेली, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या