परमबीर सिंह यांच्यावर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई पोलीस दलातील इतर पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

ठाण्यातील एका बांधकाम व्यासायिकाच्या तक्रारीनंतरपरमबीर सिंह यांच्यासह डीसीपी अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, पीआय आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, खासगी इसम सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.  या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय पुनमिया आणि सुनील जैन हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे असा आरोप आहे. 

केस मागे घेण्यासाठी बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंग, अकबर पठाण यांच्यासह वरिष्ठ पोलिसांवर आहे. आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी १५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, असा आरोप या व्यावसायिकाने तक्रारीत केला आहे. 

मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप सिंह यांनी केला होता. तेव्हापासून सिंह सातत्याने चर्चेच्या वर्तुळात आहेत. आता सिंह यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या