मानखुर्दमध्ये अग्नितांडव

  • सागीर अन्सारी & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मानखुर्द - येथील मंडाला झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत अनेक झोपड्या आणि भंगाराची गोदामे बेचिराख झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेत दोघे जण गंभीर भाजले.
मंडाला झोपडपट्टी नजीक एका तेलाच्या गोदामाला लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाच्या 25 गाड्या, 15 ते 20 पाण्याचे टँकर घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाले होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेली ही आग विझवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते.
मंडालानजीक एका तेलाच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीने बघता बघता मंडाला झोपडपट्टी परिसराला विळखा घातला. यात राजू यादव आणि अजू पाल हे तरूण गंभीर झाले. त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भंगार आणि रसायनांनी भरलेली गोदामे मंडाला परिसरात असल्याने या आगीचा भडका उडाल्याचे बोलले जाते. हे अग्नितांडव काही सिलिंडर फुटल्याने वाढल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. ही आग आटोक्यात आणण्यात अरुंद रस्ते आणि गल्लीबोळामुळे अनंत अडथळे येत होते.

मंडाला येथील भीषण आगीने आजूबाजूच्या तब्बल ४०० झोपड्या तात्काळ रिकाम्या करण्यात आल्या. दरम्यान, आगीच्या घटनेनंतर परिसरातील २ हजार रहिवाशांना नजीकच्या शाळांमध्ये हलवण्यात आल्याने मोठी हानी टळल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर व उपप्रमुख संगिता लोखंडे यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या