पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली फसवणूक

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मुंबई - पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक होत असल्याचं धक्कादायक वास्तव ‘मुंबई लाइव्ह’नं उघड केलं आहे. हा सगळा प्रकार घडतोय मुंबईच्या खार-सांताक्रुझ परिसरात. या विभागातील महिला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत स्वस्तात घरं मिळणार या आशेनं तासनतास रांगेत उभ्या राहून फॉर्म भरत आहेत आणि त्यासाठी त्यांना मोजावे लागत आहेत 120 ते 200 रुपये. विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन सोपी आणि स्वस्तात असतानाही लोकांना लुबाडण्याचा धंदा काही दलालांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे हा अर्ज म्हणजे तुम्हाला घर मिळणार याची खात्री नाही. हे केवळ म्हाडाकडून सुरू असलेले सर्व्हेक्षण आहे. परवडणाऱ्या घरांची गरज किती आहे हे पडताळून पाहण्यासाठी हे सर्व्हेक्षण आहे. जेव्हा केव्हा म्हाडाला परवडणाऱ्या घरांसाठी जागा मिळेल त्यानंतर घरे बांधण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि मग त्यानंतर या घरांसाठी लॉटरी निघेल. या लॉटरीत जे बाजी मारतील त्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न केवळ दहा लाखांत पूर्ण होईल. मात्र काही दलाल याचा फायदा घेऊन सर्वसामान्यांना फसवत आहेत. त्यामुळे या दलालांना वेळीच रोखण्याची गरज आहे. याविषयी ‘मुंबई लाइव्ह’ने म्हाडाला विचारले असता म्हाडाने अशी फसवणूक होत असल्याचं मान्य केलयं. पण ही बाब थेट म्हाडाशी संबंधित नसल्याचं म्हणत त्यांनी हातही वर केलेत.

पुढील बातमी
इतर बातम्या