टिळकनगर स्टेशनवर तोतया टीसीला अटक

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

वडाळा - टिळकनगर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांकावरून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलमधील प्रथम वर्गाच्या डब्यात एका तोतया टीसीला अटक करण्यात आलीय. एका अधिकृत मुख्य तिकीट निरीक्षकाने या तोतया टीसीला रविवारी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी राहुल भिकाजी मांढरे (25) नावाच्या तोतया टीसीला वडाळा लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

रेल्वे बोर्डात मुख्य तिकीट निरीक्षक म्हणून कर्तव्यावर असलेले मेहदी कृष्ण बुटान रविवारी रात्री 11.35 च्या सुमारास नेहमीप्रमाणे तिकीट तपासणीचे काम आटपून आपल्या घरी जात होते. बुटान हे सीएसटीच्या लोकलमध्ये प्रवास करत होते. सीएसटी लोकलमध्ये राहुलने डब्यातील प्रवाशांकडे तिकीटाची विचारणा करण्यास सुरुवात केली. राहुलची संशयास्पद हालचाल पाहून मुख्य तिकीट निरीक्षक बुटान यांनी त्याला टोकले. "मी टीसी आहे. माझी पोस्टिंग वाशी स्थानकात असून ओळखपत्र वाशीच्या लॉकरमध्ये आहे" असे राहुलने सांगितले. त्यामुळे बुटान यांनी राहुलच्या हातातील आयताकृती पुस्तक खेचून घेतले. राहुल हा तोतया टीसी असल्याची खात्री करूनच बुटान यांनी कुर्ला स्थानकात राहुलला उतरवले. रेल्वे पोलिसांची मदत घेऊन वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्याची चौकशी केली. चौकशीत राहुल तोतया टीसी असल्याचे उघड झाले.

पुढील बातमी
इतर बातम्या