एकतर्फी प्रेमातून तरूणीची बदनामी करणाऱ्या तरूणाला घाटकोपर पोलिसांनी नुकतीच पुण्यातून अटक केली आहे. प्रविण ठिगळे असं या तरूणाचं नाव आहे. पीडित तरुणीच्या नावे ८ बनावट फेसबुक अकाऊंट बनवून त्यावर तिचे अश्लिल फोटो अपलोड करत या माथेफिरूने तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
घाटकोपरच्या भटवाडी परिसरात आरोपी प्रविण ठिगळे हा आई, वडिल आणि बहिणीसोबत राहतो. काही दिवसांपूर्वी तो बहिणीसोबत मार्केटमध्ये गेला असताना. बहिणीच्या काॅलेजमध्ये असलेल्या पीडित मैत्रिणीसोबत त्याची ओळख झाली. पीडित तरूणी ही मुंबई महापालिकेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.
त्यानंतर प्रविण हा बहिणीला पुढे करत तरुणीशी ओळख वाढवू लागला. त्यानंतर दोघेही या ना त्या कारणाने भेटू लागल्याने प्रविण तिच्या प्रेमात पडला. पीडितेचंही आपल्यावर प्रेम असल्याचा गैरसमज त्याच्या मानात झाला होता. त्याने तरुणीला प्रपोज केल्यावर, मात्र तिने त्याला नकार दिला. त्यानंतर राग अनावर झालेल्या प्रविणने तिला त्रास देण्यास सुरूवात केली.
पीडित तरुणी प्रविणला टाळू लागल्याने तिला अद्दल घडवण्यासाठी आणि तिच्या आयु्ष्यात दुसरा कुणी येऊ नये, या भावनेतून त्याने तरुणीची फेसबुकवर बदनामी करण्यास सुरूवात केली. त्याने तरूणीचे ८ बनावट फेसबुक अकाऊंट बनवले आणि पाॅर्नस्टारसोबत तरूणीचे फोटो जोडून तो फेसबुकवर अपलोड करू लागला. ही बाब तरुणीच्या नातेवाईकांनी तिच्या लक्षात आणून दिल्यानंतर तिने जुलै महिन्यात पोलिसांकडे तक्रार नोंदवली.
तरुणीने पोलिसांत धाव घेतल्याचं लक्षात आल्यानंतर प्रविण मुंबईसोडून पुण्याला पळून गेला. दरम्यान घाटकोपर पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला पुण्याच्या राजगुरू नगर इथून अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने तरुणीने नकार दिल्यामुळे तो निराश झाला होता. इतर कुठलाही मुलगा तिच्याशी बोलल्यास त्याला आवडायचं नाही. त्यातूनच त्याने तरुणीची बदनामी केल्यास सर्व तिच्यापासून लांब राहतील या अनुषंगाने हे पाऊल उचलल्याचं पोलिसांना सांगितलं. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी भा.द.वि कलम ५००, ५०९ आणि आयटी अॅक्टअंतर्गत कारवाई केल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं.