हरवलेली दागिन्यांची पिशवी प्रवाशाला परत मिळाली

वडाळा - हार्बर मार्गवरील सानपाडा ते डॉकयार्ड रोड स्थानकादरम्यान प्रथम श्रेणीच्या डब्यातून दागिन्यांची पिशवी घेऊन प्रवास करणाऱ्या जितेंद्र नरेंद्र मेहता (48) यांची चोरीला गेलेली दागिन्यांची पिशवी पुन्हा सापडल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

जितेंद्र मेहता हे बेलापूर येथे राहत असून त्यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. ते शुक्रवारी रात्री हार्बर च्या सानपाडा ते डॉकयार्ड रोड स्थानकादरम्यान प्रथम श्रेणीच्या डब्यातून आपल्या घरातील दागिन्यांची पिशवी घेऊन प्रवास करत होते. आपल्या पायाजवळ ठेवलेली पिशवी दिसत नाही, असे मेहता यांच्या डॉकयार्ड रोडला पोहोचल्यावर लक्षात आले. त्यांना वाटले की आपली पिशवी चोरीला गेली ते सीएसटी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. परंतु तेथील पोलिसांनी वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करा, असे सांगितले.

मेहता यांनी तत्काळ वडाळा पोलीस ठाणे गाठले, तक्रार नोंद करीत असतानाच एका व्यक्तीचा कॉल वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात आला की एका व्यक्तीची पिशवी सापडली आहे. त्यानुसार पोलीस हवालदार मनोज गुजर आणि राजेंद्र बाबर यांच्या सोबत मेहता यांना जाण्यास सांगितले, असता ही पिशवी माझीच आहे असे मेहता यांनी सांगितले. तेव्हा ज्या व्यक्ती जवळ ही पिशवी होती त्यांनी ती पिशवी नजर चुकीने उचलून दुसऱ्या प्रवाशास देण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती पिशवी त्या प्रवाशांची नाही असे समजल्यावर आपण वेगळ्याच व्यक्तीची पिशवी उचलून आणली आहे, असे लक्षात येताच त्यांनी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधून पोलिसांच्या ताब्यात ही पिशवी देण्याचे ठरविले.

या पिशवीत साधारण 3 लाख 50 हजार रुपयांचे दागिने होते. नजर चुकीमुळे ही घटना घडली असली तरी एका सतर्क प्रवाशामुळे दुसऱ्या प्रवाशाला आपल्या दागिन्यांची पिशवी परत मिळाली आहे. याबाबत कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. तर संपूर्ण खातरजमा करून मेहता यांना सदरील दागिन्यांची पिशवी सुपूर्द करण्यात आली आहे. असें वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या