सराईत खिसेकापू अटकेत

गर्दीचा फायदा घेत लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या एका सराईत खिसेकापूला हार्बर मार्गवरील वडाळा लोहमार्ग पोलिसांच्या गस्ती पथकाने मोठ्या शिताफीने पकडले आहे. सादिक साबीर सय्यद उर्फ शोएब (28) असे त्याचे नाव आहे. तो धारावीतील ढोरवाड्याचा रहिवासी असून तो पोलीस अभिलेखावरील सराईत खिसेकापू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

अँटॉप हिल येथे राहणारे सुभेलाल यादव गेल्या 3 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास वडाळा स्थानकावरील फलाट क्रमांक 2 वर लोकलच्या प्रतिक्षेत उभे असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्यांचा खिसा कापून 10 हजाराची रोकड लांबवली होती. खिसा कापल्याचे लक्षात येताच पीडित सुभेलाल यादव यांनी तात्काळ वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. लायगुडे यांचे पथक या अज्ञात खिसेकापूच्या शोधात होते. मंगळवारी रात्री हार्बरच्या गुरू तेग बहादूरनगर रेल्वे स्थानकात पनवेलला जाणारी लोकल थांबली असता गर्दीचा फायदा घेत एक तरुण लोकलमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा खिसा चाचपत होता. दरम्यान गस्तीवर असलेल्या रेल्वेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या लक्षात येताच त्यांनी मोठ्या शिताफीने या तरुणाच्या मुसक्या आवळल्या.

त्याची कसून चौकशी केली असता त्याने दोन गुन्ह्यांची कबुली दिली. या गुन्ह्यात दानिश नावाचा साथीदार आपल्या सोबत असल्याचे त्याने सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून 6 हजार 50 रुपयाची रोकड आणि दुसऱ्या गुन्ह्यातील मोबाइल सापडला असून वडाळा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या