'हिंदुस्थानी भाऊ' विकास पाठक याला धारावी पोलिसांकडून अटक

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व कॉलेज ऑनलाइन पद्धतीनं सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ऑनलाइन क्लास सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला होता. मात्र, विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन सुरू असलं तरी, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिक्षण मंत्र्यांच्या या निर्णयामुळं अनेक विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय, परीक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याची मागणी केली. तसंच, सोमवारी मुंबईसह राज्याच्या अनेक भागात विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शनं केली. याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या प्रकरणी आता 'हिंदुस्थानी भाऊ' उर्फ विकास पाठक याला अटक करण्यात आली आहे.

सोमवारी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शनं केली. याप्रकरणी विकास पाठक याला पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेत चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे.

'हिंदुस्थानी भाऊ'ने विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. हिंदुस्थानी भाऊने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. यामध्ये त्याने विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केलं. विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानं मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

दहावीची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना करण्यासाठी ‘हिंदूस्थानी भाऊ’ धारावीत आला आणि त्याच्या समर्थनासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी अंडी, दगड, चपला फेकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हुल्लडबाजीमुळे परिस्थिती चिघळू लागली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून विद्यार्थ्यांना पांगवले.

नागपूरमध्येही ‘हिंदुस्थानी भाऊ’च्या आवाहनावरून क्रीडा चौक भागात हजारो विद्यार्थी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गोळा झाले. दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करा, शिक्षण ऑनलाइन असताना परीक्षा ऑफलाइन कशा, असा सवाल करीत, ‘हिंदुस्थानी भाऊ’चा जयजयकार करण्यात आला.

मेडिकल चौक येथे मोर्चा येताच काही विद्यार्थ्यांनी बसच्या काचा फोडल्या. पोलिसांनी विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ते हिंसक होऊ लागल्याने पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. परंतु एका गटाने पंडित बच्छराज शाळेसमोरील स्कूल बसच्या काचा फोडल्या. त्यामुळे आंदोलन पुन्हा पेटले.

पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पाच विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलक विद्यार्थी असल्याने पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळली.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात येतील, असे शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी जाहीर केल्यानंतर ठरावीक वर्गातून या निर्णयाला विरोध होऊ लागला. समाजमाध्यमांवर अर्वाच्च भाषेतील मजकूर प्रसारित करणारा ‘हिंदूस्थानी भाऊ’ विकास पाठक यानेही शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध केला. तसेच राज्यभरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवा, अशी चिथावणी त्याने विद्यार्थ्यांना समाजमाध्यमावर दिली होती.

मी सोमवारी धारावीत जाऊन वर्षां गायकवाड यांच्या घराबाहेर आंदोलन करेन, असेही त्याने समाजमाध्यमावर जाहीर केले होते. या ‘हिंदूस्थानी भाऊ’ने रविवारी इस्टाग्रामवर संदेश पाठवून राज्यातील विविध शहरांमध्ये कधी आणि कुठे आंदोलन करायचे, याची माहिती प्रसारित केली. त्याच्या या संदेशांनी विद्यार्थ्यांना चिथावणी मिळाली.

‘हिंदूस्थानी भाऊ’च्या चिथावणीमुळे सोमवारी धारावीत हजारो विद्यार्थी जमले. दुपारी १२ ते १ दरम्यान धारावीत विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी झाली. विद्यार्थ्यांनी घोषणा फलकांद्वारे सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवला. काही वेळातच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर हुल्लडबाजी सुरू केली आणि दगड, चपला, अंडी फेकली. त्यात काही पोलीसही जखमी झाले.

शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. दोन दिवसांपासून या प्रकरणात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपास केला जाईल. हे कृत्य कोणत्या संघटनेकडून ठरवून करण्यात आले आहे का याची शहानिशा करून, याचा पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले.

पुढील बातमी
इतर बातम्या