हे मुंबई विमानतळ की सोन्याची खाण?

मुंबई - मुंबई विमानतळावर दर काही दिवसांनी तस्करांकडून मोठ्या प्रमाणावर सोनं जप्त केलं जात आहे. त्यामुळे हे मुंबई विमानतळ आहे की सोन्याची खाण असाच प्रश्न पडला आहे. कारण शुक्रवारी सोन्याची तस्करी करणाऱ्या चिनी नागरिकांना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. झोऊ वेवू आणि चेन यांयां यांच्याकडून कस्टमने 24 कॅरेट सोन्याचे भगवान बुद्धाचे पेंडंट असलेली सोन्याची चेन जप्त केली आहे. याची किंमत तब्बल 37 लाख 65 हजार रुपये आहे.

गुरुवारी रात्री जेट एयरवेजच्या फ्लाईटने हे दोघेही भारतात उतरले. त्यांच्या सामानाच्या तपासणीत 1 हजार 255 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चेन कस्टमच्या हाती लागल्या. हे दोघेही चीनस्थित शेझवान ओबीआ डायमंड कंपनीत कामाला असून सोन्याची तस्करी केल्याचं त्यांनी मान्य देखील केलं आहे.

दुसऱ्या एका कारवाईत कस्टमने नागपूरच्या जोडप्याकडून साडे सतरा लाखांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. संजय कुकरेजा आणि सविता कुकरेजा अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून 585 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि चेन जप्त केल्या आहेत. संजय कुकरेजा यांचं नागपूरच्या सीता बुर्डी परिसरात मोबाईलचे दुकान असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या