उत्तर प्रदेशमधून एकाला आणि मुंबईतील दोन आयएसआय एजंटांना अटक

दवा के लिये पैसा देना है!  या वैद्यकीय भाषेचा वापर करीत, तीन कथित आयएसआय एजटांना राज्य एटीएस आणि उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आफताब अली (35), अल्ताफ कुरेशी (32) आणि जावेद नवीवाला (33) यांचा समावेश आहे. 

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) संपर्कात फैजाबाद येथील आफताब अली नावाचा तरुण असल्याचे समजताच एटीएसने आफताबवर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती. आफताबचं पाकिस्तानात फोनवर जे काही बोलणं सुरू होतं, त्यावर देखील युपी एटीएसची करडी नजर असतानाच आफताबच्या बँक खात्यावर दवा के लिये पैसा देना है असं सांगत 15 हजार जमा करण्यात आले. हे पैसे मुंबईतून आल्याचे समजताच उत्तर प्रदेश एटीएस आणि महाराष्ट्र एटीएसने एकाचवेळी आफताब आणि मुंबईतील अल्ताफ कुरेशीला अटक केली. अल्ताफची कसून चौकशी केली असता, त्याने हे पैसे जावेदच्या सांगण्यावरून टाकल्याचे समोर येताच राज्य एटीएसने तत्काळ जावेदच्या मुसक्या आवळल्या. 

जावेदचे रेकाॅर्ड काढले असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. जावेद हा पकिस्तानातील आयएसआयच्या संपर्कात असून, त्याला दवा के लिये पैसा देना है या कोडवर्डमध्ये आदेश आले होते. त्यानुसार जावेदने हे पैसे अल्ताफ कुरेशीला आफताबच्या बँक खात्यात टाकण्यास सांगितले होते. आतापर्यंत जावेदच्या चौकशीत गेल्या अनेक दिवसांपासून जावेद हा पाकिस्तानी आयएसआयच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहेत जावेद आणि अल्ताफ?
जावेद नवीवाला हा मुळचा गुजरात राज्यातील राजकोट जिल्हा येथील दोराजीचा राहणारा आहे. मुंबईला जावेद हा आग्रीपाड्यात राहत असून, तो हवालाचा धंदा करतो. जावेदची 2009 साली अल्ताफशी ओळख झाली. दोघेही दोराजीचे रहिवाशी असल्याने अल्ताफ देखील जावेद बरोबर काम करू लागला. धंदा मंद असल्याने 2013 मध्ये अल्ताफ कुरेशीने आपला गाशा गुंडाळला आणि दोराजीला रवाना झाला. एक वर्ष झाल्यावर तो पुन्हा मुंबईला जावेदकडे परतला. अशावेळी जावेद जे काम देत असे, ते तो करीत असे. जावेदचे अनेक नातेवाईक हे पाकिस्तानात राहत होते. यामुळे त्याचा वरचेवर पाकिस्तानातील लोकांशी संपर्क असे. त्यातच तो आयएसआयच्या संपर्कात आला आणि त्यांच्यासाठी काम करू लागल्याचा दावा राज्य एटीएसने केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या