कमला मिल आग: वन अबोव्हच्या तिन्ही मालकांना पोलिस कोठडी

कमला मिल कंपाऊंड आग प्रकरणातील आरोपी आणि वन अबोव्ह पबचे मालक क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकरला भोईवाडा न्यायालयाने १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संघवी बंधूला बुधवारी मध्यरात्री तर मानकरला गुरूवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

आगीत वन अबोव्ह पबमध्ये १४ जाणांचा झालेला मृत्यू, परवाना नसतानाही हुक्का पार्लर चालवणे इ. सर्व आरोपांची एकत्रित चौकशी करण्यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. तर आरोपींच्या वकिलांनी आरोपींवर सुरूवातीला कोणतंही कारण न दाखवता पोलिसांनी गुन्हे नोंदवले आणि नंतर तपास केला. मोजोस बिस्ट्रोच्या मालकांवर कारवाई करण्याऐवजी आरोपींना दोषी धरलं. अग्निशमन दलाच्या अहवालानंतर तपासाची दिशा बदलली, असं म्हणत पोलिसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेत आरोपींना पोलिस कोठडी सुनावली.

काय म्हणाले आरोपींचे वकील?

अग्निशमन दलाने प्रत्यक्षदर्शी मनोज निकम याचा जबाब नोंदवला आहे. या जबाबात त्याने सर्वात पहिल्यांदा आग मोजोस बिस्ट्रो पबला लागल्याचं सांगितलं. यासह अन्य १४ प्रत्यक्षदर्शींचे जबाब आहेत. अग्निशमन दलाने व्हिडिओ क्लिपही सादर केली आहे. मोजोसला अग्निशमन दलाने परवानगी दिली होती, तर आग लागल्यानंतर ती यंत्रणा का कामाला आली नाही? गुन्ह्यातील मुख्य आरोपीबाबत कोणतेही पुरावे पोलिसांनी गोळा केले नाहीत. तर तिन्ही आरोपी पोलिसांच्या समोर स्वत:हून हजर झाले आहेत. असं असतानाही त्याच्यावर ३०४ चा गुन्हा का नोंदवण्यात आला? पोलिसांनी दबाव टाकण्यासाठी आरोपींच्या कुटुंबातील व्यक्ती आणि मॅनेजरवर गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली. असं मत तिन्ही आरोपींच्यावतीने त्यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर व्यक्त केले.

तर, पोलिसांच्या तपासात पक्षपातीपणा दिसून येतो. असंही आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. मात्र न्यायाधीशांनी तिघांनाही जामीन नाकारत त्यांना १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा-

कमला मिल आग: वन अबोव्हचे तिन्ही मालक गजाआड


पुढील बातमी
इतर बातम्या