कुलभूषण जाधव असेही !

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. पाकिस्तानी कोर्टाच्या या निर्णयाचा देशातूनच काय तर जगभरातून निषेध केला जातोय. माजी नौदल अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांची सामाजिक भान जपणारी दुसरी बाजूही आहे.

वडिलांच्या पोलीस खात्यातील निवृत्तीनंतर संपूर्ण जाधव कुटुंबीय हे पवईत राहण्यास गेले होते. डिलाईल रोड इेथे कुलभूषण जाधव हे लहानाचे मोठे झाले. मात्र त्यांचे समाजकार्य नंतर पवईला गेल्यावरही सुरूच राहिले. विजय कनोजिया (30) हे आपल्या बालपणी लॉन्ड्रीमध्ये डिलीवरी बॉय म्हणून काम करत असत. ते कुलभूषण यांच्या पवई येथील घरात देखील कपडे देत असत. हे करता करता त्यांची ओळख कुलभूषण यांच्याशी झाली. कुलभूषण जाधव यांनी कनोजिया यांना नुसते अभ्यासातच प्रोत्साहान दिले नाही तर त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च देखील उचलला. जाधवांकडे बघून कनोजिया यांना देखील लष्करी सेवेत जाण्याची इच्छा झाली. यासाठी त्यांना कुलभूषण यांनी मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देखील केले. 'जेव्हा जेव्हा कुलभूषण जाधव मुंबईत असत तेव्हा तेव्हा मी त्यांच्याबरोबर त्यांच्या शेजारी रात्रीचं जेवण करायचो' असं विजय कनोजिया सांगतात.

कनोजिया यांनी फिजिक्समध्ये पदवी घेतली असून, त्यांनी एनडीए आणि सीडीएसच्या परीक्षा देखील दिल्या होत्या. पण काही कारणास्तव ते पुढे जाऊ शकले नाहीत. 'मी भारत सरकारकडे कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची विनंती केली आहे' असे कनोजिया यांनी सांगितले. दरम्यान, कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताने दिलेल्या फाशीच्या शिक्षेचा निषेध करण्यासाठी पवईमध्ये निषेध मोर्चाही काढण्यात आला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या