तिच्यानंतर 'त्याने'ही केली आत्महत्या, बीडीडी चाळीतील दुर्दैवी घटना

नायगावच्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या मंजू गायकवाड या २२ वर्षीय पोलीस शिपाई तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला महिना उलटत नाही. तोच तिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेला तिचा मित्र मुकेश बोरगेने ३१ डिसेंबरला राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. मंजूच्या आत्महत्येनंतर मुकेश मानसिक तणावाखाली गेला होता. त्यातूनच त्यानं हे पाऊल उचललं असण्याची शक्यता भोईवाडा पोलिसांनी वर्तवली आहे.

काय आहे प्रकरण?

राखीव पोलीस दलात कार्यरत असलेली मंजू २०१४ मध्ये पोलिस दलात दाखल झाली होती. नायगावच्या बीडीडी चाळीत मंजू मोठी बहीण आणि भावासोबत रहात होती. गेल्या काही दिवसांपासून मंजू मानसिक तणावाखाली होती. त्यातूनच २९ नोव्हेंबर रोजी दुपारी १च्या सुमारास तिची मोठी बहीण भावाला डबा देण्यासाठी गेली असताना मंजूने गळफास लावून आत्महत्या केली. शेजाऱ्यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं. 

घटनास्थळी पोलिसांना कोणतीही चिठ्ठी मिळाली नसल्याने आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. मात्र त्यावेळी मंजूच्या मोठ्या बहिणीने मृत मुकेश विरोधात भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मंजू आणि मुकेशमध्ये ४ वर्षांपासून प्रेमसंबध होते. त्याने लग्नास नकार दिल्यानेच मानसिक तणावातून मंजूने हे कृत्य केल्याचा आरोप तिच्या बहिणीने मुकेशवर केला होता. त्यामुळे भोईवाडा पोलिसांनी मुकेशवर लक्ष केंद्रीत केलं होतं.

मानसिक तणावातून मुकेशचीही आत्महत्या

मंजूच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीनंतर मुकेश मानसिक तणावाखाली गेला. या तक्रारीमुळे आपले पूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाल्याचं वाटत असल्याने तो मनोमनी खचला होता. त्याच्या बदलेल्या स्वभावामुळे मुकेशला कुणीही एकटं सोडत नव्हतं. ३१ डिसेंबर रोजी वडिलांना पोलिस बंदोबस्ताची ड्युटी लागल्याने ते सकाळीच घराबाहेर पडले. तर दोन्ही भाऊही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी मुकेश आणि त्याची आई घरी होती.

दरम्यान बिल्डिंगखाली भाजी आणण्यासाठी आई दुपारी १ च्या सुमारास खाली उतल्यानंतर मुकेश घरातील नायलाॅनची दोरी पंख्याला बांधू लागला. हा प्रकार समोरच्या बिल्डिंगमधील दुसऱ्या माळ्यावर रहात असलेल्या एका महिलेने खिडकीतून पाहिल आणि तिने आरडा ओरडा करण्यास सुरूवात केली. त्यावेळी इमारतीतील रहिवाशांनी मुकेशच्या घराच्या दिशेने धाव घेतली. दरवाजा तोडून रहिवाशांनी घरात प्रवेश केला. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुकेशला त्यांनी तातडीने परळच्या के.ई.एम रुग्णालयात हलवलं. मात्र फार उशिर झाला होता. डाॅक्टरांनी मुकेशला तपासून मृत घोषीत केलं. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या