सारा तेंडुलकरच्या नावाचं खोटं अकाऊंट, एका सॉफ्टवेअर इंजिनीअरला अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & मुंबई लाइव्ह नेटवर्क
  • क्राइम

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा हिचं बनावट ट्विटर अकाऊंट बनवणाऱ्या एका साॅफ्टवेअर इंजिनीअरला मुंबई पोलिसांनी गुरूवारी अटक केली. २०१७ मध्ये याच व्यक्तीने साराचं बनावट ट्विटर अकाऊंट बनवून त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अपशब्द लिहिले होते. त्यानंतर याप्रकरणी सायबर पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव नितीन सिसोदे (३९) असं असून तो पेशाने साॅफ्टवेअर इंजिनीअर आहे. नितीन याने गुगलवरून साराचा फोटाे डाऊनलोड करून एक बनावट ट्विटर अकाऊंट बनवलं. त्यानंतर या बनावट अकाऊंटवरून आक्षेपार्ह पोस्ट देखील केले. त्यानंतर ९ आॅक्टोबर २०१७ रोजी याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

'असं' पकडलं आरोपीला

सायबर पोलिसांनी सांगितलं की, हे बनावट ट्विटर अकाऊंट ज्या मोबाईल नंबरवरून बनवण्यात आलं, त्या नंबरचा शोध घेण्यात आला. मोबाईल नंबरवरून आयएमईआय नंबर कळाल्यानंतर पोलिसांनी 'आयपी अॅड्रेस'द्वारे आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला.

पोलिस कोठडीत रवानगी

नितीनच्या घराचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. नितीनला न्यायालयासमोर हजर केलं असता, त्याला ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या