थुंकी चाटायला लावल्याने 'त्या' तरुणाची आत्महत्या

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

क्षुल्लक कारणावरून मारहाण करत, थुंकी चाटायला भाग पाडल्याने एका ३५ वर्षीय भाजी विक्रेत्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री कफ परेडमध्ये घडली. प्राथमिक माहितीनुसार या भाजी विक्रेत्या तरुणाने बेरोजगारी आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. मात्र, त्या भाजी विक्रेत्याने लिहिलेली सुसाईड नोट सापडल्यानंतर त्याला हे कृत्य करण्यास चौघांनी भाग पाडल्याची माहिती उघड झाल्यानंतर कफपरेड पोलिसांनी त्या चौघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आणि त्यांना अटक केली.

काय आहे वाद?

कफ परेड येथील जुन्या वसाहतीजवळ असलेल्या बाजारात मृत कासिम शेखचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. त्याच बाजारात असलेल्या चौघांशी कासिमचे काही कारणांवरून वाद झाल्यामुळे संबंध बिघडले होते. नेहमीप्रमाणे कासिम शुक्रवारी बाजारात भाजी विक्रीसाठी बसला असताना या चौघांनी कासिमची खोड काढत त्याच्याशी वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या चौघांनी कासिमला बेदम मारहाण केली. ऐवढ्यावरच न थांबता या चौघांपैकी दोघांनी आपल्या पायातील बुटांवर थुंकत कासिमला ते चाटण्यास भाग पाडले.

आणि कासिमने आत्महत्या केली

त्या चौघांनी संपूर्ण बाजारात त्याला हे कृत्य करायला भाग पाडल्याने कासिम मनातून पूर्ण खचला. याच मानसिक तणावातून शनिवारी कासिमने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कफ परेड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला कासिमची झडती घेतली. मात्र, त्याच्याजवळ कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना सापडली नाही. कालांतराने एक सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. त्यामध्ये शुक्रवारी कासिमसोबत घडलेल्या प्रसंगाची हकीकत सांगत, आपण त्या भागातील इस्माईल शेख (४७), अकबर शेख (३५), करिया पावसे (३५) आणि अफजल कुरेशी यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचं कासिमनं लिहिलं होतं. त्यानुसर कफपरेड पोलिसांनी दोषी आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या