पत्नीला घरी आणण्यासाठी पतीची अनोखी शक्कल, मुलीच्या गळात फास घालून पाठवला फोटो

रागाच्या भरात गावी गेलेल्या पत्नीला बोलवण्यासाठी एका पतीने अनोखी शक्कल लढवली. अजय गौड नावाच्या व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांच्या मृत्यूचा बनाव रचला. या कृत्यामुळे त्याच्या मुलीचा जीव गेला असता.

पत्नीचा विश्वास बसावा आणि ती तात्काळ घरी परत यावी म्हणून पतीने आपल्या मुलाला मृतांसारखे पांढरे कपडे परिधान करायला लावले. तर मुलीच्या गळ्यात फास घालून ते दोन्ही फोटो आपल्या पत्नीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले. मात्र, ही शक्कल लढवणं पतीला चांगलीच महागात पडली आहे. 

आरोपी दुसऱ्यांदा आपल्या मुलीच्या गळ्यात फास घालून लटकवत होता. त्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. हा आवाज ऐकून शेजारी जमा झाले आणि त्यांनी त्या मुलीला वाचवले.

शेजाऱ्यांनी कुरार पोलीस ठाण्यात या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 33 वर्षीय आरोपी अजय गौडवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीने पत्नीला परत बोलवण्यासाठी मुलगा आणि मुलीच्या मृत्यूची खोटी कहाणी तयार केली होती. ही घटना शनिवारी घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अजय गौडला ड्रग्जचे व्यसन आहे. दारूच्या नशेत तो आपल्या पत्नी आणि मुलांना मारहाण करायचा. आरोपीच्या या त्रासामुळे दोन वर्षांपूर्वी पत्नी मुलांसह तिच्या गावी गेली होती. परंतु, काही दिवसांपूर्वी अजय गावी गेला आणि मुलगा आणि मुलीला सोबत घेऊन मुंबईला आला. आरोपी नशेत असताना आपल्या मुलाला मारहाण करायचा असे शेजाऱ्यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या