ऐकावं तितकं नवलच! चक्क बस स्टॉपच गेला चोरीला

आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकराच्या चोरी झालेल्या पाहिल्या असतील किंवा ऐकल्या असतील. पण कधी बस स्टॉप चोरीला गेल्याचे ऐकले आहे का? यावर तुमचा विश्वास बसत नसेल. पण हे खरे आहे. ठाण्यात चक्क बस स्टॉपच चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. 

धक्कादायक म्हणजे ठाण्यातील बेस्ट बस स्टॉपचा पूर्ण लोखंडी ढाचा सहा दिवसानंतर सापडला आहे. पण तोही कॅडबरी उड्डाणपुलाखाली भंगारात सापडला. पोलिसांनी सांगितले की, "त्यांना उड्डाणपूलाखाली संपूर्ण ढाचा पडल्याची माहिती मिळाली आणि आम्ही घटनास्थळी धाव घेतली."

नौपाडा पोलिस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेल्या बस स्टॉप एका रात्रीत गायब झाल्याची घटना गुरुवारी घडली. भारतीय दंड संहितेच्या कलम 379(चोरीची शिक्षा) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

नौपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले की, “आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यासाठी एक टीम तयार केली आहे आणि बस स्टॉप घेऊन जाणारा ट्रक सापडला आहे. आम्ही ट्रकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे कोणी केले हे लवकरच कळेल.”

दरम्यान, शुक्रवारी सकाळी रहिवाशांनी पोलिस आणि ठाणे महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर नवीन बस स्टॉप बसवण्यात आल्याचे ठाणे महापालिका परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाणे महानगरपालिका परिवहन व्यवस्थापक बालचंद्र बेहेरे म्हणाले, “रहिवाशांनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही संबंधित ठेकेदाराला हरवलेल्या बस स्टॉपबाबत कळवले आहे. आम्ही तातडीने नवीन बस निवारा बसवण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या होत्या.

काही रहिवाशांनी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांच्याशी संपर्क साधला होता, त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे तक्रार केली होती आणि त्यांना नवीन निवारा बसवण्याची आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची विनंती केली होती.

नौपाडा येथील रहिवासी दीपक क्षत्रिय म्हणाले, “गेल्या अडीच वर्षांत बस स्थानक चोरीला गेल्याची तिसरी घटना घडली आहे. गोखले रोडवरील टिप टॉप आणि तीन हात नाक्याजवळील बस शेल्टरमध्ये यापूर्वी चोरीच्या घटना घडल्या आहेत. नौपाडा पोलिस स्टेशन बसस्थानकापासून केवळ 100 मीटर अंतरावर असूनही आणि सर्व भागात पोलिसांची गस्त असूनही एका रात्रीत बस स्टॉप चोरीला कसा जाऊ शकतो.

ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “त्यांनी बीओटी (बिल्ट, ऑपरेट, ट्रान्सफर) अंतर्गत दहा वर्षांसाठी एका कंत्राटदाराला बस स्टॉपची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कंत्राट दिले होते. करार आता अंतिम वर्षात आहे.”


हेही वाचा

दिवा रेल्वे स्थानकावर मोबाईल चोरट्यामुळे प्रवाशाने गमावला हात

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातील शौचालयातून 12 लाख रुपयांचे सामान चोरीला

पुढील बातमी
इतर बातम्या