लाँकडाऊनमध्ये फिरण्यासाठी आमदारांच्या स्टिकरचा गैरवापर, अंधेरीत एकाला अटक

आमदारांच्या गाड्यांना लावले जाणारे "विधानसभा सदस्य' चे स्टिकर सध्या कोणीही आपल्या गाड्यांना लावून फिरत आहे. मुंबईत विविध विधानसभा मतदारसंघांत असे स्टिकर लावून फिरणाऱ्या डमी आमदारांची संख्या जरा जास्तच आहे. अशाच एका डमी आमदाराचा सामना अंधेरी पोलिसांशी झाला. 
'घरात बसून कंटाळा आल्याने गाडीला हा स्टिकर लावला' असे पोलिसांना सांगितले. या महाभागाचे उत्तर ऐकून पोलिसांची तळपायाची आग मस्तकात गेली, मग काय त्याच्या विरोधात थेट गुन्हा नोंदवत पोलिसांनी त्याची गाडी जप्त केली.

अंधेरीच्या मरोळ परिसरात आरोपी
मोहम्मद साबेत अस्लम शाह  हा राहतो. शहरात कोरोनाचा आकडा दिवसे-दिवस वाढत चालला आहे. याला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण अशा परिस्थितीतही लॉकडाऊनचे अनेक महाभागाकडुन उल्लंघन सुरु आहे. यामुळे पोलिसांनी राज्यभरात धडक कारवाई आणि नाकांबदी लावली आहे. खाजगी वाहनाना विना परवाना बाहेर फिरण्यास सक्त मनाई असताना देखील काही माथफिरु दुचाकी, चारचाकी घेऊन बाहेर फिरत आहेत. अशातच पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी काही जण नवनवीन क्लृप्त्यांचा अवलंब करत आहेत. अंधेरी परिसरात होंडा सिटी कार फिरताना पोलिसांना आढळली. त्या कारवर विधानसभा आमदार व अशोक स्तंभाचे स्टीकर चिकटवण्यात आले होते.

याबाबत कार चालवणा-या मोहम्मदकडे पोलिसांनी चौकशी केली असता ते स्टीकर बनावट असल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्याच्याविरोधात तोतयागिरी, बनावटीकरण, संचारबंदीचा भंग व संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी आरोपीची  जामीनावर सुटका करण्यात आली आहे.  आरोपीचे पार्श्वभूमी  तपासण्याचे काम सुरू असून  प्राथमिक तपासात तरी लॉकडाऊन मध्ये फिरण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे.

विशेष म्हणजे चौकशीत असे लक्षात आले की,  आपली आमदाराशी जवळीक आहे किंवा आमदार आपल्या खिशातच आहे, हे दाखविण्यासाठी हे स्टिकर मिळविण्यासाठी आमदारांचे नातेवाइक, मित्र आणि जवळचे कार्यकर्ते यांचा आटापिटा चालला असतो. आमदारांनीही अशांना नाखूष न करण्याचे धोरण पत्करलेले दिसत आहे. त्यामुळेच हे स्टिकर कोणालाही मिळत आहे. हिरव्या रंगाचे हे स्टिकर असून त्यावर विधानसभा सदस्य, असे लिहिलेले असते. या स्टिकरवर तीन सिंहांची राजमुद्रा असते. विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांच्या गाड्यांना असे स्टिकर लावले जाणे अपेक्षित असताना ते उटसूट कोणीही लावत असल्याने मुंबईत नेमके किती आमदार आहेत ? किंवा आमदाराच्या किती गाड्या आहेत, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे. अनेकांनी राजकारणात स्वताला वाहून घेतले आहे. राजकीय नेत्यांचे प्रचंड आकर्षण या भागातील नागरिकांना असते. त्यामुळे जरी अनेकांना आमदार म्हणून नाही मिरवता आले, तरी आमदाराच्या नावाचा लोगो ( चिन्ह ) असणाऱ्या गाडीत बसून फेरफटका मारायला मिळाला तरी अनेकांना जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते. गाडीला टोल द्यावा लागू नये, महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी वाहनाला लवकर रस्ता मिळावा, पार्किंग मूल्य भरावे लागू नये, गाडीच्या काचा काळ्या असतील आणि चौकात पोलिसांनी अडवून नये अशा विविध ठिकाणी फायदा मिळावा म्हणूनही आमदाराचा लोगो लावणारे कार्यकर्ते आहेत. अनेक वेळा समोरून आलेल्या गाडीला आमदार असल्याचा लोगो आहे म्हणून लोकप्रतिनिधीशी वाद नको म्हणून पोलीस देखील अशा वाहनांची तपासणी करण्याचे टाळीत असतात. त्याचाच फायदा अनेक वेळा कार्यकर्ते घेताना दिसत आहे. विधानसभा सदस्य असे लिहलेले स्टीकर बेधुंद कार्यकर्ते आपल्या गाड्याना लावून जे गैर प्रकार करीत आहे अशांवर प्रशासनकडून कारवाई सुरू आहे, माञ लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांना वेळीच आवर घालणे ही गरजेचे आहे, अन्यथा हाच कार्यकर्ता कधी तरी त्या लोक प्रतिनिधीला अडचणीत आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या