मालाडमध्ये मनसे विभाग अध्यक्षाला फेरीवाल्यांकडून जबर मारहाण

मनसेने फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतल्यापासून मनसे आणि अनधिकृत फेरीवाले यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. त्यातूनच मालाड पश्चिमेकडे रेल्वे स्थानकाजवळ दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मनसे विभाग अध्यक्षावर फेरीवाल्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुशांत माळवदे असं या विभाग अध्यक्षाचं नाव असून या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.

संजय निरुपम यांची चिथावणी?

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम सध्या मनसेच्या फेरीवाला हटाव मोहिमेचा जोरदार विरोध करत आहेत. निरुपम यांनी मालाडमध्ये सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात फेरीवाल्यांसमोर चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. याच भाषणाचा निषेध करण्यासाठी सकाळी सुशांत माळवदे आपल्या कार्यकर्त्यांसह मालाड पश्चिम रेल्वे स्टेशनच्या बाहेर आले होते. पोलिसांनीही प्रसंगावधान राखून माळवदे यांना ताब्यात घेतलं होतं.

गंभीर दुखापत

मात्र, माळवदे यांना सोडून देण्यात आल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा फेरीवाला हटाव मोहीम सुरु केली. यावेळी झालेल्या संघर्षात माळवदे यांना मारहाण झाल्याचं सांगण्यात येत आहे. माळवदे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली असून मनसेचे कार्यकर्ते मालाड पश्चिम येथे जमायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी या परिसरात अतिरिक्त कुमक मागवली असून पुढील तपास सुरू आहे.

माझ्या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मनसेला कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणी दिला? अशा स्थितीत फेरीवाल्यांनी काय करावे?  हप्तेखोरीसाठी आलेल्या मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी हा हल्ला केला आहे.

- संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस

मनसे विभाग अध्यक्षावरील हल्लेखोरावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे. संजय निरुपम यांच्यावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. संजय निरुपम मूर्खासारखं बोलत असेल, तर त्याचं थोबाड फोडू. कोण हप्तेखोरी करतंय हे सगळ्यांनाच दिसत आहे. यापुढे आमचं फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन आणखी तीव्र होईल.

- संदीप देशपांडे, प्रवक्ते, मनसे

पुढील बातमी
इतर बातम्या