'पोकर गेम'च्या संचालकाला धमकावणारा अटकेत

वांद्रे परिसरात राहणारा आॅनलाइन 'पोकर गेम' चालवणाऱ्या कंपनीचा संचालक अमिन रोझानी यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी अटक केली. इरफान मेमन असं या आरोपीचे नाव आहे. कुख्यात गँगस्टर फहीम मचमच याच्या नावाने परदेशातून फोन करून तसंच व्हॉट्‌स अॅपवरून व्हॉइस मॅसेज पाठवून आरोपीने रोझानी याला धमकी दिल्याचं पुढे आलं आहे. आरोपीने अशा प्रकारे एकूण १३ वेळा रोझानीला धमकावलं होतं.

कशी आली माहिती पुढे?

वांद्रे येथील सामाजिक कार्यकर्त्या शबनम शेख यांना खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी हरिश यादव, बिलाल कुतूबुद्दीन, शार्पशूटर जगबीर, संतोष सिंग, राहुल अमील मो. शमसुल इस्लाम आणि झुबेर खान याला अटक केली आहे.

त्यानुसार पोलिस चौकशीत बिलाल आणि जगबीरने आपल्याला फहीम मचमचने शबनम शेखसोबतच पवईतील हिरानंदानी बंधू आणि पोकर गेमचा संचालक अमिन राेझानी याचीही सुपारी दिल्याचं सांगितलं.

तीन व्यावसायिक होते रडारवर

इतर शार्पशूटर मुंबईतलं काम घेत नसल्यामुळे फहिमने जगबीरलाच इतर तीन व्यावसायिकांची माहिती गोळा करण्यास सांगितली होती. मात्र जगबीरला अटक झाल्यानंतर इरफान मेमनवर ही जबाबदारी सोपवण्यात आली.

अमिन यांच्या मोबाइलवर २९ डिसेंबर २०१७ रोजी पहिल्यांदा पाकिस्तानमधून धमकीचा फोन करण्यात आला. पण हा फोन त्याने उचलला नव्हता. त्यानंतरही धमकीचे येत असल्यामुळे त्याने फोन स्पीकरवर ठेऊन ते रेकॉर्ड केले होते. फोनवरून बोलणारी व्यक्ती ५० लाख रुपयांची खंडणी मागायची.

'असा' घाबरला अमिन

सुरुवातीला अमिन यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर आरोपीने व्हाइस काॅलसोबतच व्हॉट्‌स अॅप, व्हॉइस मॅसेज, टेक्‍ट मॅजेसवरून धमकावल्याने अमिन घाबरले. ३० जानेवारीला अमिन आपल्या घराच्या कंपाऊंमधून कार घेऊन बाहेर पडत असताना एक व्यक्ती त्यांच्या कारच्या नंबर प्लेटचा फोटो घेत असल्याचं तेथील सुरक्षा रक्षकांना दिसलं. ही माहिती सुरक्षा रक्षकांनी दिल्यानंतर अमिन यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.

खंडणीखोराला पकडलं

त्यानंतर हे प्रकरण खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आलं. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मेमनला अटक करण्यात आली. अमिन यांच्या कारच्या नंबर प्लेटचा फोटोही त्यानेच काढल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्याच्याविरोधात ८० गुन्हे दाखल आहेत.

फोन नेमके कुठून?

मेमनच्या भावाशी अमिन यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे अमिन यांना त्रास दिल्यास भावालाही त्रास होईल, या उद्देशाने त्याने फहीम मचमचला अमिन यांची माहिती दिल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. अमिन यांना पाकिस्तान आणि दुबईतून फोन आल्याचे प्राथमिक तपासानुसार स्पष्ट होत आहे; पण ते खरोखरच परदेशातून आले, की मेमनने तंत्रज्ञानाच्या आधारे ते केले, याचा तपास पोलिस करत आहेत.


हेही वाचा-

बिग बाॅसमधील स्पर्धक झुबेर खानला अटक, सलमानवर केले होते आरोप


पुढील बातमी
इतर बातम्या