धक्कादायक, चायनीज भेळ विक्रेत्याने कापला मुलीचा अंगठा

अल्पवयीन मुलगी खेळत असताना तिचा धक्का चायनीज भेळच्या टेबलाला लागल्याने राग अनावर झालेल्या विक्रेत्याने त्या मुलीचं बोटच कापल्याची धक्कादायक घटना गोवंडीतल्या शिवाजीनगर परिसरात उघडकीस आली आहे. शिफा शेख असं या मुलीचं नाव आहे. शिफावर सध्या लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

संपूर्ण प्रकार

चेंबूरच्या शिवाजीनगर परिसरात फुरकानिया मशिदीजवळ शिफा ही तिच्या कुटुंबियांसोबत राहते. त्याच परिसरात आरोपी ताजुद्दीन (२५) हा चायनीज भेळचा बाकडा लावतो. मंगळवारी सायंकाळी ताजुद्दीनने नेहमीप्रमाणे चायनीज भेळचा बाकडा लावला होता. त्याच परिसरात शिफा ही मैत्रिणींसोबत खेळत होती. त्याचवेळी अचानक शिफाचा धावताना तोल गेल्याने शिफाचा धक्का ताजुद्दीनच्या चायनीज भेळच्या टेबलाला लागला. त्यावेळी तजुद्दीन सुरीने कांदा कापत होता. शिफाच्या धक्क्याने तजुद्दीनच्या चायनीज भेळच्या टेबलावरील शेजवान चटनी खाली सांडल्याने राग अनावर झालेल्या तजुद्दीनने हातातल्या सुरीने शिफावर हल्ला केला. या हल्यात तजुद्दीनच्या धारधार सुरीने शिफाचा अंगठा कापला गेला. रक्तबंबाळ शिफाचा हात पाहून घाबरलेल्या तजुद्दीनने तेथून पळ काढला.  

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिफाच्या घरच्यांनी शिफाला तातडीने लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात शिफाच्या अंगठ्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या प्रकरणी शिफाच्या घरच्यांनी तजुद्दीन विरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या